नवी दिल्ली: राज्यातील साखर उद्योग सक्षम करण्यासाठी, या क्षेत्रासमोरील अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. राज्यातील साखर उद्योगांना अधिक भक्कम करण्यासाठी आणि त्यापुढील असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी दिल्लीत आज केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील खासदार उपस्थित होते. 


साखर उद्योगांचे खेळते भांडवल, कर्ज पुनर्रचना, आयकराचे विषय, को-जनरेशन इत्यादी अनेक विषयांवर आणि एकूणच साखर उद्योगांच्या अडचणी आणि उद्योगाचे सशक्तीकरण यावर आज नवी दिल्लीत बैठक झाली. या सर्वच बाबतीत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


साखरेचा निर्यात कोटा हा वापरला गेला असल्याने हा कोटा वाढवून देण्याची मागणीसुद्धा आजच्या बैठकीत करण्यात आली. त्यावर योग्य आणि सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन अमित शाह यांनी दिले. प्राथमिक सहकारी सोसायट्यांचे बळकटीकरणावर सुद्धा आज चर्चा झाली. 


पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात माझ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अटक झाली पाहिजे, असा पूर्ण प्रयत्न झाला. याची संपूर्ण जबाबदारी तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यावर सोपविण्यात आली होती. यातील काही माहिती मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आहे. मी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर कोणताही आरोप केला नाही, एवढेच सांगतो की हा आदेश वरून आला होता.


सत्तास्थापनेची कागदपत्रं राज्यपाल कार्यालयात नाहीत, या माहिती अधिकारात प्राप्त झाल्याच्या माहितीसंदर्भात उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुप्रीम कोर्टात केस सुरू असल्याने ती कागदपत्रं त्यांच्याकडे आहेत, ती राज्यपाल कार्यालयाकडे नाहीत. राज्यपालांकडून योग्य लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतरच आम्ही सरकार स्थापन केले आहे.


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 


ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गेल्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या, मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आलं होतं. अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं की, ज्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत."