बीड : कोरोना सोबत लढण्यासाठी आरोग्य प्रशासनातील कर्मचारी भविष्यात कमी पडू शकतात म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य योद्धा ही योजना सुरु केली आहे. पण वैद्यकीय शिक्षण विभागातील 129 परिचारिकांची रिक्त पदे स्पर्धा परीक्षा होऊन गुणवत्ता यादी लागलेली असतानाही भरणे बाकी आहे. केवळ तांत्रिक कारणामुळे राज्यातील 129 परिचारिकांची इच्छा असतानाही त्यांना आपले आरोग्य व्यवस्थेमध्ये योगदान देता येत नाही.


कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आरोग्य व्यवस्था सज्ज आहे. विशेष म्हणजे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयवर याचा सर्वात मोठा भार असणार आहे. राज्यातील 24 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तब्बल 2700 परिचारिकांची पदे रिक्त असल्याचे समजते. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दवाखान्यांमध्ये परिचारिकांची ही संख्या सद्यस्थितीत खूप अपुरी आहे. म्हणूनच अशा परास्थितीत राज्यातील 129 परिचारकांची पदे का भरली जात नाहीत हा प्रश्नच आहे.


दोन वर्षा पूर्वी राज्यामधून एकूण 28000 उमेदवारांनी ही स्पर्धा परीक्षा दिली होती. वैद्यकीय शिक्षण विभागाने यातील परीक्षार्थींची मेरिट लिस्ट पण लावली. मात्र गुणवत्ता यादीत नंबर आलेल्यांना नियुक्तीपत्र मात्र दिले नाही. आता जिथे राज्यात ज्यांना ज्यांना कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपले योगदान द्यायचे आ, अशांना राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला गरज तिथे या पात्र परिचारिकांना सेवेत सामावून घेणे गरजेचे आहे.


केवळ वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व संचालक यांच्या दिरंगाईमुळे ही भरती प्रक्रिया रखडली गेली आहे आणि परिचारिकांच्या नेमणुका मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून उर्वरित जागा भरुन घेण्यासाठी परवानगीचे पत्र सचिव संजय मुखर्जी यांना प्राप्त झाले असूनही सचिव त्यावर सही करत नाहीत आणि केवळ एवढ्या कारणास्तव राज्यातील 129 गुणवत्ताधारक परिचारिकांचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे.