(Source: Poll of Polls)
वसई-विरार पालिकेतील उपायुक्त रेड्डी यांचं अखेर निलंबन, पालिकेत भ्रष्टाचाराचं मोठं जाळं असल्याचं उघड
वसई-विरार शहर महापालिकेतील (Vasai Virar Municipal Corporation) नगररचना विभागातील वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराच्या आरोप असलेले उपायुक्त वाय. एस. रेड्डी (Y S Reddy ) यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे.

वसई विरार : वसई-विरार शहर महापालिकेतील (Vasai Virar Municipal Corporation) नगररचना विभागातील वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराच्या आरोप असलेले उपायुक्त वाय. एस. रेड्डी (Y S Reddy ) यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी ही कारवाई केली आहे. संबंधित पदासाठी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे.
ईडीने एकाचवेळी 13 ठिकाणी छापे टाकले होते
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई 14 मे रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ED) केलेल्या मोठ्या छापेमारीनंतर करण्यात आली आहे. नालासोपारातील 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी, ईडीने (ED) एकाचवेळी 13 ठिकाणी छापे टाकले होते. या मोहिमेतील सर्वात मोठा खुलासा वाय. एस. रेड्डी (Y S Reddy ) यांच्या हैदराबादमधील घरातून झाला. छाप्यात 8.6 कोटींची रोख रक्कम तसेच 23.25 कोटींचे हिरेजडित दागिने, तसेच सोने व चांदी जप्त करण्यात आले आहे. ईडीच्या या तपासातून वसई-विरार महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट सहभाग उघड झाला आहे. ईडीने जप्त केलेल्या दस्तऐवजांतून महापालिकेतील भ्रष्टाचाराचं मोठं जाळं उघडकीस आलं असून, भविष्यात आणखी अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. नगरविकास विभागाकडून तसेच सामान्य नागरिकांकडूनही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
मे 2016 रोजी शिवसेनच्या तत्कालीन नगरसेवकाला 25 लाखाची लाच देताना भ्रष्ट आणि वादग्रस्त अशा नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी याला ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी रेड्डीच्या वसईतील वसई विकास सहकारी बँकेतील लॉकरमधून 34 लाख रुपयांची रोकड आणि दोन किलो सोने हाती लागले होते. तर हैदराबाद येथील घरात 92 लाख रुपये रोख आणि चार किलो सोने सापडले होते. यावेळी रेड्डीला निलंबित करण्यात आलं होतं. मात्र पालिकेनं त्याला पुन्हा 2017 साली सेवेत घेतलं. आता तब्बल 9 वर्षानंतर पुन्हा रेड्डीकडे कोट्यवधींचे घबाड सापडलं आहे. त्यामुळे अशा लबाड अधिकाऱ्यांच्या मागे किती सक्षम यंत्रणा राबते हे दिसून येते. रेड्डी हा सिडकोचे अधिकारी आहे. त्याला 2010 पासून प्रतिनियुक्तीवर वसई विरार पालिकेत पाठवले होते. पालिकेने 2012 रोजी महासभेच्या मान्यतेनुसार महापालिकेने त्यांना उपसंचालक नगररचना या पदावर नियुक्त केलं होतं.
महत्वाच्या बातम्या:
ED : वसई-विरार महापालिकेच्या अधिकाऱ्याकडे 8 कोटींची कॅश, 23 कोटींचे सोने; ईडीच्या धाडीत घबाड सापडलं



















