मुंबई :  फॉक्सकॉन प्रकल्पावरून (Foxconn project) राज्यात वातावरण तापलं असताना आता यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर टीका केलीय. " फॉक्सकॉनच्या अग्रवाल यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देतो असे त्यांना सांगितले, पण तोपर्यंत त्यांचा गुजरातसोबत करार झाला होता. आमचे सरकार येण्याआधी तो करार झाला होता. परंतु, यावरून आता काही जण बोलत आहेत, बोलणाऱ्यांनी आपले कर्तृत्व सांगावे, महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात राज्याला गुजरातच्या मागे नेले. पण आम्ही राज्याला पुन्हा एक नंबरवर आणू, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.  


मुंबईत आज लघु उद्योग भारती प्रदेश अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.  महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात महाराष्ट्राला गुरजातच्या मागे नेले. परंतु, आता आम्ही पुन्हा राज्याला पहिल्या नंबरवर घेऊन जाऊ. अनेकदा गुजरातची चर्चा होते,  अलीकडे तर जास्तच होते. आपण चौथ्या क्रमाकांवर आहोत. परंतु 2017 ला आपण पहिल्या क्रमांकावर होतो. दुर्दैवाने आपण दोन वर्षात मागे गेलो. आता जे बोलत आहेत त्यांनी गुजरातला पहिल्या क्रमांकावर नेले. पण मी माझ्या काळात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेलं होतं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 


रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. "आपल्याकडे रिफायनरी येणार होती. त्यातून 3 लाख 50 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. 5 लाख रोजगार येणार होते. रिफानरी तयार झाली असती तर राज्य 10 वर्ष पुढे गेले असते. पण त्याला विरोध झाला. मोठी गुंतवणूक आपण घालवली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलाय.    


"सर्व बंद करणार हेच यांचे धोरण आहे. सर्व बंद करणार मग गुजरातच्या पुढे कसे जाणार? आपल्याकडे गुंतवणूक व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. भ्रष्टाचार म्हणजे किती भ्रष्टाचार करायचा असतो. मागील दोन वर्षात सबसिडीसाठी देखील लाच द्यावी लागत होती. पाच ते सहा दलाल होते ते आधी जमीन खरेदी करायचे आणि अधिकारी ते घ्यायचे. काही दलाल असतात आणि काही आधिकऱ्यांना पैस खायचे असतात. आता अशा अधिकाऱ्यांची खैर नाही. अशा अधिकाऱ्यांना आता घरी पाठवणार आहोत. पैसे घेऊन भरती केले की असेच होते. कारण ते पैसे वरपर्यंत जातात असा आरोप देवेंद्र फडणीस यांनी ठाकरे सरकारवर केलाय.  


देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा लघू उद्योग आहेत. आपण जेव्हा मोठ्या उद्योगाचा विचार करतो तेव्हा संपूर्ण पुरकता ही लघु उद्योगातून येते.  कोरोना काळात देखील लघु उद्योग जगला पाहिजे यासाठी पाठबळ देण्याचे काम केले. राज्यात देखील लघु उद्योगाला बळ देणे हा आमचा प्रयत्न आहे.  ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होण्यासाठी मोठी संधी आपल्या उद्योगांना मिळत आहे. रशियाला चीनवर विश्वास नाही, त्यामुळे भारताला संधी आहे. कोरोना नंतर चीनवरचा पश्चिम राष्टांचा विश्वास कमी झाल्यामुळे भारतावर या राष्ट्रांचा विश्वास आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात राज्याचा महत्वाचा वाटा आहे. आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करणे महत्त्वाचे आहे."