Sadabhau Khot : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच महाराष्ट्राच्या राजकारणातला धुरंदर आणि चाणक्य असल्याचे वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलं. त्या माणसाला प्रस्थापितांनी अनेक वेळा घेरण्याचा प्रयत्न केला. पण त्या माणसाचा आम्ही अभिमन्यू होऊ दिला नाही आणि भविष्यात देखील होऊ देणार नाही असे खोत म्हणाले. 


भारतीय जनता पक्ष हा गावगाड्यांमध्ये काम करणारा पक्ष 


भारतीय जनता पक्ष हा गावगाड्यांमध्ये काम करणारा पक्ष आहे. त्यांनी एका गावगड्यात काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली आणि मी जिंकून आलो असेही खोत म्हणाले. आमच्या नऊच्या नऊ जागा जिंकून आल्या. जनतेला बरे वाईट कळते. चांगले निर्णय सरकारने घेतले आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत. त्यामुळं जनता फार खुश असल्याचे खोत म्हणाले. 


हिंदू संस्कृतीत कोणतेही काम करायचे असेल तर श्री गणेशाचे दर्शन घेऊन काम करायचे असते, म्हणून आज सकाळी मी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्याला साकडे घातले की यावर्षी चांगला पाऊस पडू दे, यावर्षी धन धान्याची रास उभी राहू दे आणि पिकाला सोन्याचा भाव मिळू दे असे साकडे घातल्याचे खोत म्हणाले. पडक्या घराचे कोणी मालक होत नाही. त्यामुळं लक्षात आले त्या वाड्यातल्या लोकांना, की इथे चांगला निवारा मिळू शकतो म्हणून ते इथे आल्याचे खोत म्हणाले. 


जयंत पाटलांचा पराभव म्हणजे महाराष्ट्रातल्या श्रमिकांचा शरद पवार यांनी घडवून आणलेला पराभव


जयंत पाटील साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, शेतकरी चळवळीतील खंबीर नेतृत्व आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी आणि शेतमजुरांची लढाई श्रमिकांची लढाई लोकांपर्यंत नेली आहे.पवार साहेब हे जाणते राजे आहेत, त्यांना समजायला पाहिजे होते की आपण उद्धव साहेबांचे सरकार आणू शकतो, त्यांना मुख्यमंत्री करू शकतो, तर एका शेतकरी नेत्याला उभे करत असताना ते निवडून येतील का? याची पहिल्यांदा त्यांनी खातरजमा करायला हवी होती असे खोत म्हणाले. जयंत पाटील यांचा पराभव म्हणजे या महाराष्ट्रातल्या श्रमिकांचा शरद पवार यांनी घडवून आणलेला पराभव असल्याचे खोत म्हणाले. 


महाविकास आघाडी ही लुटारुंची आघाडी


शेतमजूर गाव गाड्यांचा अपमान शरद पवार यांनी केला आहे. म्हणून चळवळी करणाऱ्या चळवळ्याच्या पाठीमागे खंजीर शरद पवार यांनी खूपसल्याचे खोत म्हणाले. काँग्रेसचा इतिहास बघितला तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील यांनी पराभूत केले होते. त्यामुळं कपिल पाटील असे हे सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन लढणारी माणसं आहेत. महाविकास आघाडी ही लुटारुंची आघाडी आहे. सगळे लुटारु एकत्र आले, त्यांचे नामांतर करुन अलीबाबा चाळीस चोरांची आघाडी असे करावे लागेल असेही खोत म्हणाले. मला वाटते की लोकसभेची निवडणूक मी लढवली आहे. अनेक सर्वे मी बघितले आहेत. हे सर्वे म्हणजे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत का? की महाभारतात संजयला कळत होते की, युद्धभूमीवर काय चालत आहे, तसे हे आहेत का? जनता हाच मोठा सर्वे आहे, जनतेला कळते कधी कुणाला आणायचे कधी कुणाला फसवायचे, ते फार हुशार आहेत असे खोत म्हणाले.स र्वे म्हणजे हाय फाय लोकांचा एक धंदा झाला आहे. एवढ्या जागा येणार तेवढ्या जागा येणार सांगत असतात असे खोत म्हणाले.  


महत्वाच्या बातम्या:


शेट्टींना शेतकऱ्यांचं काही देणघेणं नाही, ते शेतकऱ्यांसाठी नव्हे तर खासदारकीसाठी लढत होते, खोतांचा हल्लाबोल