मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठा आरक्षणापासून ते राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारावर स्पष्ट भाष्य केले. एक लवाद जर सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) ऐकत नसेल तर देशात लोकशाही राहणार आहे की नाही असा खडा सवालही त्यांनी यावेळी केला. ज्यांनी पाशवी बहुमत मिळते अशी लोक देशासाठी घातक असतात. हिटलर हे त्याचे उदाहरण असल्याचे सांगत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली.
शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचे अभिनंदन केले. जरांगे यांनी धनगरांच्या आरक्षणाच्या मुद्याला पाठिंबा दिला. जातीमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जरांगे यांचे अभिनंदन करत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. मराठा आरक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनात विशेष कायदा का केला नाही असा सवालही त्यांनी केला. जरांगे यांनी भाजपपासून सावध राहावे. ही लोक फूट पाडत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. अंतरवाली सराटी गावात लाठीचार्ज करण्याचा, गोळीबार करण्याचा आदेश कोणत्या जनरल डायरने केला असा सवालही ठाकरे यांनी केला.
देशात लोकशाही राहणार की नाही?
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव न घेता टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने यांचे कानपट फोडले. तरी सकाळी उठून काही झालं नसल्यासारखं वागतात. एक लवाद जर सुप्रीम कोर्टाचे ऐकत नसेल तर देशात लोकशाही राहणार आहे की नाही, असा उद्गविन सवाल ठाकरे यांनी केला. भारत मातेची लोकशाही टिकणार की नाही ? 30 तारखेला बघू.. जनतेच्या न्यायालयात जाऊ द्या असं मी म्हणत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
घराणेशाहीच्या मुद्यावर मोदींवर बोचरी टीका
पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपकडून राजकीय घराणेशाहीवर टीका केली जात आहे. या घराणेशाहीच्या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, सगळीच घराणी वाईट नसतात.. तुम्हाला घराणेशाहीचा तिटकारा असेल तर तुमच्याकडे आमच्याकडून आलेल्या घराणेशाहीचे काय करणार? सद्दाम, मुसोलिनी, हिटलर यांना घराणेशाहीची पार्श्वभूमी होती का असा प्रश्न त्यांनी केला. ज्यांच्या घराण्याचा आगापिछा नसतो अशी लोक घातक असतात. जर्मनी हे त्याचे उदाहरण आहे. जर्मनीत आता हिटलरचा तिटकारा आहे. त्यालाही पाशवी बहुमत मिळाले. त्यानेदेखील अंधभक्त तयार झाले असल्याचे त्यांनी म्हटले.
खुर्ची डळमळीत असेल तर देश मजबूत
उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या राजकारणाच्या बाजूने भाष्य केले. एकाच पक्षाला आता पाशवी बहुमत असणारे सरकार नको असे त्यांनी स्पष्ट म्हटले. जेव्हा खुर्ची डळमळीत असते तेव्हा देश मजबूत होतो. पी. व्ही. नरसिंहा राव, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात आघाड्यांचे सरकार होते. मात्र, या काळात देश मजबूत झाल्याकडे त्यांनी म्हटले. 2014 मध्ये मोदींना वेड्यासारखा पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी भाष्य केले. येत्या निवडणुकीत आपलं सरकार येणार. आपलं सरकार आणणार म्हणजे आणणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
भाजपला इशारा
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना नेते, शिवसैनिकांना मिळत असलेल्या कारवाईच्या धमक्यांवर त्यांनी भाष्य केले. ठाकरे यांनी म्हटले की, आज दमदाट्या करणाऱ्यांना सांगतो, आमच्या लोकांना विनाकारण आज त्रास दिला तर आमचं सरकार आलं तर तुम्हालाही उलट टांगू, असा इशारा त्यांनी दिला.
सुरतेला पळून जाणारे महाराष्ट्राचे हित काय करणार
छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा बदला म्हणून मुंबई, महाराष्ट्र लुटली जात असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. मुंबईला दिल्लीसमोर उभं करायचं आहे.. हा त्यांचा डाव आहे. हे आम्ही कधीही होऊ देणार नाही. मुंबईला दुसऱ्या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या ऐवजी आता नीती आयोग मुंबईचा विकास करणार असल्याचे त्यांनी म्हटले. एका बिल्डरला पालकमंत्री केलं आहे. त्याचं ऑफिस मुंबई महापालिकेत आहे. मुंबई बिल्डरांना देण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.