बीड : भगवानगडावर यंदाचा दसरा मेळावा होणार नाही, हे अखेर स्पष्ट झालं आहे. कारण संत भगवान बाबा यांचं जन्मगाव असलेल्या सावरगावातील गावकऱ्यांनी निमंत्रण दिल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी सावरगावात दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.


''कर्मभूमी नाही, तर भगवान बाबा तुमची जन्मभूमी बोलवत आहे. जन्मस्थळाची माती लावून नवीन अध्याय सुरु करत आहे. दसरा मेळाव्यासाठी सावरगावात येत आहे'', असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं आहे.

https://twitter.com/Pankajamunde/status/913438516616495104

भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यासाठी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा विरोध होता. पंकजांनी सामंजस्याची घेतलेली भूमिकाही त्यांनी नाकारली. त्यानंतर आज कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली. त्यानंतर सावरगावच्या गावकऱ्यांनी पंकजांना दसरा मेळाव्यासाठी निमंत्रण दिलं.

पंकजांनी आपण दसरा मेळाव्याला येत असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर समर्थक आता जोमाने दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. दसरा दोन दिवसांवर आला असतानाही ठिकाण निश्चित न झाल्याने मुंडे समर्थकांच्या मनात संभ्रम होता. अखेर हा संभ्रम दूर झाला आहे.

भगवानगड दसरा मेळावा वाद काय आहे?


दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्यात समर्थकांना संबोधित करायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ही परंपरा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी चालू ठेवली. मात्र गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर दसरा मेळावा यापुढे होणार नाही, अशी भूमिका गेल्या वर्षीपासून घेतली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेनंतर पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याशी समर्थकांना संबोधित केलं. यावर्षीही हा वाद कायम आहे.

एकीकडे मुंडे समर्थक दसरा मेळाव्यासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे गडाचे महंत नामदेव शास्त्री त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. यावर्षी गडावर दसऱ्याला कोणत्याही व्हीव्हीआयपीला परवानगी देण्यात येऊ नये, असं पत्र नामदेव शास्त्रींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.

पंकजा मुंडेंनीही समाजासाठी वर्षातून केवळ 20 मिनिटं गडावर येण्याची परवानगी द्यावी, असं पत्र नामदेव शास्त्रींना लिहिलं. मात्र त्यांनी ही विनंती अमान्य केली. त्यानंतर सावरगावातील गावकऱ्यांनी दसरा मेळाव्यासाठी भगवान बाबांच्या जन्मभूमीत येण्याचं निमंत्रण दिलं. हे निमंत्रण स्वीकारत पंकजा मुंडेंनी गडाऐवजी सावरगावात दसरा मेळावा घेण्याची नवी परंपरा सुरु केली आहे.