पुणे : पुणेकरांचा लाडका बाप्पा असलेला दगडूशेठ गणपतीची (Pune Ganeshotsav 2023) प्रसिद्ध फक्त राज्यातच नाही तर देशभर आहे. सर्वसामान्य आणि कलाकारांपासून तर चक्क सैनिकांपर्यंत दगडूशेठ गणपतींच्या (Dagadusheth Ganpati) दर्शनाची ओढ लागलेली असते. त्यामुळे सैनिकांनी आपल्या बटालियनमध्ये दगडूशेठ गणपती स्थापना करण्याचा निर्णय घेतला. देशाच्या सुरक्षेसाठी सैनिक आणि सैनिकांच्या सुरक्षेसाठी आता दगडूशेठ गणपती बटालियनमध्ये स्थापन करण्यात येणार आहे.
बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये येणं कठीण असतं. त्यामुळे यंदा भारतीय लष्करातील 33, 19, 1, 5 आणि 6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेश आणि पंजाबसह भारताच्या विविध सीमावर्ती भागात दगडूशेठच्या श्रींची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रींची हुबेहुब 2 फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार नुकत्याच या मूर्ती अरुणाचल प्रदेश, पंजाबसह विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर पसरलेली आहे. त्यामुळे मराठा बटालियनच्या प्रमुखांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांच्या वतीने व्यक्त केली. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टकडे विनंती करणारे पत्र पाठविले होते. सलग 13 वर्षे हा उपक्रम सुरु असून बटालियनच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
सामान्य नागरिकांप्रमाणेच देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक देखील गणेशाची भक्ती करतात. मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना अनेक वर्षांपासून देशाच्या विविध सीमावर्ती भागात केली जाते. यंदा ट्रस्टतर्फे 6 मूर्ती लष्करातील मराठा बटालियनला देण्यात आल्या आहेत.
सन 2011 पासून मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. सीमेवरील भारतीय लष्करी ठाण्यामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने मराठा बटालियनच्या सैनिकांना वेगळी उर्जा मिळते. तसेच या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल, अशी भावना देखील मराठा बटालियनच्या सैनिकांनी व्यक्त केली आहे.
इतर महत्वाची बातमी-