चंद्रपूर : देशातील तांदळाच्या नऊ जातींच्या संशोधनासाठी आपलं आयुष्य खर्ची करणारे दादाजी खोब्रागडे यांची आज चंद्रपुरात प्राणज्योत मालवली. पक्षाघात या दीर्घ आजाराने ते ग्रस्त होते. त्यांच्यावर चंद्रपुरातीलच खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते.
खोब्रागडेंवर उपचारासाठी कुटुंबीयांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणीही केली होती, मात्र राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर त्यांना सरकारने मदत देऊ केली. मात्र ही मदत वेळीच मिळाली असती, तर आज कदाचित खोब्रागडेंचे प्राण वाचले असते.
खोब्रागडेंवर उद्या दुपारी चंद्रपुरातील नांदेड या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दादाजी खोब्रागडे यांनी एचएमटी या तांदळाच्या जातीचा शोध लावला. धानाची विविध वाणे विकसित करून त्यांनी शेतकऱ्यांना समृद्ध केलं. त्यांच्या या अमूल्य कामगिरीसाठी एबीपी माझानेही शेती सन्मान या कार्यक्रमात खोब्रागडेंचा गौरव केला होता.
दादाजी खोब्रागडे यांचा अल्पपरिचय
पूर्ण नाव दादाजी रामजी खोब्रागडे
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड येथील रहिवासी
अल्पभूधारक शेतीत धानावर विविध प्रयोग
प्रयोगातून 1985 ते 1990 या काळात धानाच्या नऊ नवीन वाणांचा शोध
त्या काळात एचएमटीची घड्याळे प्रसिद्ध असल्याने वाणाला एचएमटी वाण असं नाव देण्यात आलं.
संशोधनासाठी चार पुरस्कार, फोर्ब्सकडूनही दखल
राज्य सरकारतर्फे उत्कृष्ट शेतकरी म्हणून गौरव
'थोरांची ओळख' या नावाने पाठ्यपुस्तकात धडा
पक्षाघातामुळे अनेक दिवसांपासून आजारी