नागपूर : मुलीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमध्ये फुगे फुगवण्यासाठी आणलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरच्या नरखेड तालुक्यातील वाढोणामधल्या घटनेने बर्थडे पार्टीच्या जल्लोषाचं रुपांतर क्षणार्धात शोककळेत झालं.
या घटनेत 7 वर्षांचा चिमुरडा नितीन अनिल चापेकर आणि 25 वर्षीय ज्ञानेश्वर भानुदास नंदनवार यांचा मृत्यू झाला, तर 7 वर्षांचा यश घनश्याम वानखडे आणि 36 वर्षीय महेंद्रसिंग बगेल गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नागपूर येथील मेडीकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाढोणा येथील शेषराव देवराम चापेकर यांच्या सात वर्षांची मुलगी प्रांजलीचा सोमवारी सायंकाळी वाढदिवस होता. त्यानिमित्त अनिल देवराम चापेकर यांनी मंडप उभारुन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सगळी तयारी सुरुच असताना फुगे फुगवण्याचं काम जरीपटका नागपूर येथील महेंद्रसिंग बगेल यांना देण्यात आले. ते फुगे फुगवत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटात सिलेंडरचे तुकडे होऊन 100 ते 150 फुटांपर्यंत विखुरले. यावेळी मंडपात नातेवाईक आणि मित्रमंडळी यायची असल्यामुळे गर्दी नव्हती. त्यामुळे अनर्थ टळला. पण फुगे फुगवताना जवळ दोन लहान मुले नितीन चापेकर, यश वानखडे खेळत होती, तर ज्ञानेश्वर हे बाजुला उभे होते. हा स्फोट इतका भीषण होता की, ज्ञानेश्वर यांचा पाय पुर्णपणे कापला गेला.