कोल्हापूर: “नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. त्याचा थेट परिणाम तुमच्या-आमच्यावर म्हणजेच सर्वसामान्यांवर होत आहे. त्यामुळे सरकारच्या ‘विकासा’च्या खोटेपणाचा बुरखा जनताच फाडेल. त्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनजागृती करेल”, असं माकपचे माजी खासदार आणि केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य निलोत्पल बसू यांनी सांगितलं.

‘माकप’चं पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील कार्यकर्ता शिबीर करवीर तालुक्यातील गिरगाव इथं संपन्न झालं. देशातील सद्यस्थिती आणि पक्षाची भूमिका, याबाबत माकपने गिरगावसारख्या खेड्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस विचारमंथन केलं.



या शिबिरानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कॉम्रेड निलोत्पल बसू यांनी अधिक माहिती दिली.

बसू म्हणाले, “जनतेने मोठ्या अपेक्षेने मोदी सरकारला निवडले. मात्र सरकारने विकासाच्या थापा मारुन जनतेचा अपेक्षाभंग केला. नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम जनतेच्या क्रयशक्तीवर झाल्याचं दिसून येतंय. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. पण सरकार मुख्य मुद्द्यांवरुन जनतेचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतंय. सरकारच्या या खोटेपणाचा बुरखा जनताच फाडेल”.

याशिवाय देशातील समस्यांचा सामना करण्यास भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जनतेची एकजूट महत्त्वाची आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

यावेळी माकपचे जिल्हा सचिव उदय नारकर यांच्यासह कॉम्रेड महेंद्रसिंह, शंकर काटाळे हे उपस्थित होते.