जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना शहरातील वाघनगर परिसरातील एका मृत कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने कुटुंबातील तब्बल 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
जळगावमधील वाघनगर परिसरात राहणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीचा मागील आठवड्यात आजारपणाने घरीच मृत्यू झाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मयताच्या स्वॅबचे नमुने घेऊन त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मयताच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने घरातील आणि जवळच्या नात्यातील मयताच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचेही स्वॅब तपासण्यात आले. त्यानंतर घरातील तब्बल 15 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली.
एकाच कुटुंबातील 15 जण कोरोना पोझिटिव्ह येण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेनंतर प्रशासनाने वाघनगर परिसर सील करत या ठिकाणच्या नागरिकांच्या आरोग्य तपासणी सुरू केल्या आहेत. शिवाय आवश्यक त्या रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनाही सुरू केल्या आहेत.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीजवळ जाताना किंवा मृतदेहाजवळ जाताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायला हवं. मास्कचा वापर करायला हवा, शक्यतो घराच्या बाहेर पडणे टाळलं पाहिजे आणि साबणाने हात धुवत राहिले पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना आता मनपा आरोग्य प्रशासनाने जारी केल्या आहेत
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती
जळगाव जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्तीपैकी आज दिवसभरात 673 व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 626 अहवाल निगेटिव्ह तर 47 अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 428 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 179 रूग्णांनी कोरोनावर मात केली तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे.
CM Uddhav Thackrey | 31 मे नंतर लॉकडाऊनचं काय होणार? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले