मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशात 24 मार्च पासून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मात्र देशभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाने 'महाराष्ट्रात 21 दिवसांच्या नंतरही लॉकडाऊन वाढवायला हवा का?' यावर पोल घेऊन वाचकांनी मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या पोलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एबीपी माझाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घेतलेल्या या पोलमध्ये लॉकडाऊन वाढवला जावा अशी अपेक्षा सर्वाधिक लोकांनी व्यक्त केली आहे.
काय सांगताहेत एबीपी माझाचे पोल
ट्विटरवर घेतलेल्या या पोलमध्ये 79 टक्के युझर्सनी लॉकडाऊन वाढवावा असं म्हटलं आहे. तर 21 टक्के लोकांनी लॉकडाऊन वाढवायला नको असं म्हटलं आहे. फेसबुक अकाऊंटवरून घेतलेल्या पोलमध्ये 79 लोकांनी पोल वाढवावा असं म्हटलं आहे. तर युट्युबवर घेतलेल्या पोलमध्ये तब्बल 81 टक्के लोकांनी लॉकडाऊन वाढवायला हवं असं म्हटलं आहे तर केवळ 19 टक्के लोकांनी लॉकडाऊन वाढवायला नकार दिला आहे. तर एबीपी माझाच्या इन्स्टाग्रामवर घेतलेल्या पोलमध्ये 67 टक्के लोकांनी 21 दिवसानंतर लॉकडाऊन वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
काय आहेत मतं?
या पोलवरील काही प्रतिक्रिया देखील आम्ही जाणून घेतल्या. लॉकडाऊन वाढवायलाच हवा. कोरोनाचे संकट देशांमधून निघून जाईपर्यंत लॉकडाऊन वाढवायला हवा. कारण 21 दिवसानंतर गर्दी होणार नाही याची काय गॅरंटी? असं एका युझरने म्हटलं आहे. तर सरकारने रिस्क घेऊ नये असं मला वाटतं. इच्छा तर नाही पण जनतेची बेजबाबदार वागणूक पाहता लॉकडाऊन वाढवण्याची वेळ हमखास येणार आहे, असं दुसऱ्या एका युझरने म्हटलं आहे.
आवश्यक असेल तरच लॉकडाऊन वाढवा. गरीब लोकांनाच यामुळं जास्त त्रास होत आहे. त्यांची गैरसोय होत आहे, अशी प्रतिक्रिया देखील एका युझरने दिली आहे.
आता चालू असलेला लॉकडाऊन वाढवणं सोपं आहे. पण जर पुन्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तर परत लॉकडाऊन करणं तितकं सोपं नसेल. वाढवायचा असेल तर तो पूर्ण देशात वाढवावा. ठराविक भागात करण्याला काही अर्थ नाही, असं मत देखील एका युझरने व्यक्त केलं आहे.
राज्यातील स्थिती लक्षात घेता, सरकार वारंवार त्यांचे निर्णय बदलत आहे आणि कोरोना बाधितांचा वाढत त्यामुळे जो पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा स्थिर होणार नाही तोपर्यंत लॉकडाऊन वाढवला तरी चालेल, अशीही प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे.
14 तारखेपर्यंत लॉकडाऊन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. या काळात सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. सर्वत्र संचारबंदी घोषित करण्यात आली असून केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनं, दुकानं, मेडिकल्स, हॉस्पिटल्स सुरू आहेत. देशात रोज कोरोनाबधितांचा आकडा वाढत चालला आहे. तीन हजारच्या वर कोरोनाबाधित देशात आढळले आहेत तर 77 लोकांना मृत्यू यामुळे झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं?
निलेश झालटे, एबीपी माझा
Updated at:
05 Apr 2020 11:22 AM (IST)
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेला लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा अशी मागणी होऊ लागली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -