मुंबई : कोरोना विषाणूमुळे दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्यामुळे आधीच अनेक उद्योग अडचणीत आले असताना आता रियल इस्टेटवर सुद्धा कोरोनाचं सावट येणार असं दिसतंय. कारण घरांच्या किमती 20% टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे, असं मत भारतातील गृहकर्ज देणारी सर्वात मोठी संस्था एचडीएफसीचे संस्थापक दीपक पारीख यांनी व्यक्त केलं.


गेल्या काही वर्षात रियल इस्टेट डेव्हलपर्सना रेरा, जीएसटीसारख्या अनेक संकटांना तोंड द्यावं लागले. तर लॉकडाऊनमुळे आलेलं दुसरं संकट म्हणजे बांधकाम क्षेत्रातील असंघटीत असा मोठा वर्ग, जो वेगवेगळ्या राज्यातून कामाच्या शोधात स्थलांतरीत होतो. या कामगार, मजूरवर्गाला बांधकामांच्या साईट्सवर परतण्यासाठी आर्थिक भत्त्यांसारख्या सोयींची गरज आहे.


मात्र या संकटामुळे खूप घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण भारत चांगल्या स्थितीत आहे. आपली परकीय चलनाची गंगाजळी पुरेशी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती लाक्षणिक पद्धतीने पडल्याने भारताच्या करंट अकाउंन्टमध्येही वाढ झाली असल्याचं दीपक पारीख यांनी सांगितलं.


या माहामारीच्या काळात जिथं काम-धंदे बंद पडले आहेत, मध्यम वर्गासह इतरांचेही प्राधान्य जीवनावश्यक गरजा पुरवण्याकडे जास्त असणार आहे. अशावेळी सामान्य ग्राहकाला घर खरेदी करण्याकडे वळवण्यासाठी टीडीआर, आयक्यूआर, यूएलसीसारख्या खर्चात सूट दिली नाही तर ग्राहक घराची रक्कम आधी देऊ शकणार नाहीत. तसेच स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फीसुद्धा काही काळासाठी माफ करावी, अशी गरज दीपक पारीख यांनी बोलून दाखविली.


या परिस्थितीत भारत, चीन, इंडोनेशिया या देशांची वित्तीय वाढ सकारात्मक नोंदवली जाईल असा पारीख यांना विश्वास वाटतो. नव्यान सुरू होऊ घातलेल्या बाजार पेठांमधली जवळपास 90 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक मार्चमध्ये भारतासारख्या विकसनशील देशांच्या हातातून गेली असल्याचे त्यांनी सांगितले. तर आपल्या शेअर मार्केटची स्थिती अजून हाताबाहेर गेली नाहीये, अशी खात्री त्यांना वाटते. रिझर्व्ह बँकेने तातडीने पावलं उचलण्याची गरजही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.


सरकारने योग्यवेळी लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे कोविड- 19 च्या संसर्गाचा ग्राफ सपाट राहण्यात मदत होईल आणि आपला देश या महामारीतून लवकर बाहेर पडेल, असा विश्वासही दीपक पारीख यांनी व्यक्त केला.