मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊननंतर हातावर पोट असणाऱ्यांचे आणि स्थलांतर करणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. या लोकांचे अक्षरशः दोन वेळा जेवणाचे सुद्धा हाल होत आहेत. अशा गरजूंसाठी ठिकठिकाणी अनेक मतदीचे हात पुढे आले आहेत. राज्यात विविध ठिकाणी अनेक जण अशा भुकेल्यांची भूक भागवताना दिसत आहेत.

अंबरनाथमध्ये फूड अॅम्बुलन्स

अंबरनाथमध्ये सुरु झालेली फूड अँबुलन्स गोरगरिबांची भूक भागवत आहे. अंबरनाथमधील काही कॉलेज तरुणांनी एकत्र येत हा उपक्रम राबवला असून त्यांना शहरातून दानशूर व्यक्ती मदत करत आहेत. टीम द युवा असं या तरुणांच्या समूहाचं नाव असून ते रुग्णवाहिकेत तयार अन्न, तसेच धान्य भरून आदिवासी पाड्यांवर नेऊन वाटप करतायत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हे तरुण हा उपक्रम राबवत होते. सुरुवातीला खासगी गाडीतून अन्न नेताना त्यांना अडवण्यात आल्यानं मित्राची अँबुलन्स घेऊन त्यातून त्यांनी ही फूड अँबुलन्स सुरू केली. त्यांच्या या फूड अँबुलन्स संकल्पनेचा शहरातील गोरगरिबांना मोठा फायदा होत असून या उपक्रमाला सधन व्यक्तींनी पाठबळ देण्याची गरज आहे.

CoronaUpdate | ही आणीबाणीची स्थिती, कोरोनाविरोधातील लढाईत सर्वजण एकवटल्याचं समाधान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेकडो किमी पायपीट करणाऱ्यांना जेवणाची सोय

गोव्याहून कर्नाटकातील आपल्या गावाला चालत निघालेल्या तीन दिवस उपाशी असणाऱ्या लोकांना बेळगाव जवळील बाळेकुंद्री, व्हन्याळ गावातील लोकांनी त्यांच्या जेवणाची सोय केली. रायचूर, विजापूर आणि बागलकोट येथील बरेच जण गेल्या पंधरा वर्षांपासून गोव्यातील कारखान्यात नोकरी करत होते. पण लॉकडाऊन झाल्यावर गोवा सरकारने त्यांना आपल्या गावी जाण्यास सांगितले. पण बस आणि अन्य वाहने गावी जाण्यासाठी उपलब्ध नसल्याने हे लोक पायपीट करत आपल्या गावाकडे निघाले. वाटेत खायला प्यायला काही मिळाले नाही, त्यामुळे ते थकले होते आणि त्यांच्यात अशक्तपणा आला होता. त्यांची अवस्था पाहून बाळेकुंद्री, व्हन्याळ गावातील लोकांनी त्यांना थांबवून त्यांची वैद्यकीय तपासणी करुन घेतली आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली, त्यानंतर हे लोक पुढे मार्गस्थ झाले.

अडकून पडलेल्या ट्रक चालकांना अन्नदान

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर संपूर्ण देशात सतत प्रवास करणाऱ्या ट्रक चालकांची चांगलीच अडचण झाली आहे. अनेक ट्रक चालक देशातील अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांची उपासमार होऊ लागल्यामुळे यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर प्रत्येक नाक्यावर, चौकात ट्रक चालक, क्लीनर, हेल्पर असे जवळपास 500 ते 600 चालक गेल्या आठवडाभरापासून अडकून पडले आहेत. त्यांच्याकडील पैसे संपल्याने जेवण ही उपलब्ध होत नव्हतं. त्यामुळे या सर्व चालकांची जेवणाची व्यवस्था येथील राजमित्र मंडळ या सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत असून या ट्रक चालकांना एकत्र करत लंगर पद्धतीने जेवण देण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान सोशल डिस्टसिंगचं देखील करण्यात येत आहे.

हातावर पोट असणाऱ्यांना मदतीचा हात

लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांचेही हाल होत आहेत. हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बोईसर मोठे औद्योगिक कार्यक्षेत्र असून या भागात रोज रस्त्यावर उभे राहून रोजंदारीवर काम करणारे हजारो कामगार होते. यातील अनेक कामगार मध्यप्रदेशमधील झाबुआ किंवा इतर राज्यातील कामगारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यापैकी काही कामगारांनी आपल्या गावाची वाट धरली, तर काही कामगार बोईसरमध्येच अडकले आहेत. अशाच कामगारांना आणि त्यांच्या परिवाराला आत्ता सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या माध्यमातून अन्नदान केलं जात आहे.