जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचं थैमान काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने मोठी वाढ होताना दिसत आहे तर दुसरीकडे मृत्यूचा आकडाही वाढत असल्याच पाहायला मिळत आहे. गेल्या 48 तासांचा विचार केला तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या विविध कोविड सेंटरमध्ये 19 रुग्णांचा जीव गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणि वाढता मृत्यूदर याबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्याची एक नकारात्मक ओळख देशभर झाल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जळगाव येथे भेट देत संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला होता. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता भास्कर खैरे यांच्यासह काही डॉक्टरांचं निलंबन करण्यात आले होते. आणि त्यांच्या जागी नवीन अधिष्ठाता आणि राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती याठिकाणी करण्यात आली होती. जेणेकरून कोरोनाचा मृत्यूदर कमी करता येईल.


जळगावात कोरोनाच्या मृत्यूदरात काही अंशी कमी आली आहे. असं असलं तरी एकाच दिवशी मोठ्या संख्येने मृत्यू होण्याचं प्रमाणही कायम असल्याने हे मृत्यू रोखण्यासाठी आता करायचं काय असा प्रश्न प्रशासनाच्या पुढे पडला आहे. कारण गेल्या 48 तासांचा विचार केला तर तब्बल 19 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3582 वर जाऊन पोहोचली आहे. यातील 244 जण आतापर्यंत मृत्यू पावले आहेत.


गेल्या 48 तासात 314 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. एकीकडे चिंता वाढवणारी आकडेवारी असली तरी कोरोनामुक्त रुग्णसंख्येत ही मोठी वाढ होताना दिसून येत आहे. आतापर्यंत 2111 इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने हीच दिलासा देणारी गोष्ट राहिली आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारच्या वतीने काही प्रमाणात शिथिलता मिळाल्या नंतर मोठ्या संख्येने नागरिक घराच्या बाहेर पडत असल्याच चित्र आहे. त्याचा परिणाम म्हणून दिवसागणिक संसर्ग देखील वाढता असल्याच पाहायला मिळत आहे.


कोमरबीड गटातील आणि वाढत्या वयातील नागरिक कोरोनाच्या विळख्यात येत असून त्यांच्यातच मृत्यूचं प्रमाण हे अधिक असल्याच पाहायला मिळत आहे. अजूनही 177 रुग्ण हे गंभीर अवस्थेत उपचार घेत असल्याने पुढील काळात अशा गंभीर रुग्णांचे जीव वाचविणे प्रशासनाच्या दृष्टीने मोठं आव्हान असणार आहे.