मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. राज्यात आज 55 हजार 469 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज नवीन 34 हजार 256 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 25 लाख 83 हजार 331 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. राज्यात  एकूण 47 लाख 2283 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.98 झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 


महाराष्ट्रात सोमवारी 47 हजार 288 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. तर 155 रुग्णांचा मृत्यू झाला होता. रविवारी राज्यात 57,074 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. 


मुंबईत 10 हजार 30 रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात  10 हजार 30 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 7019 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 3 लाख 82 हजार 4 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के झाला आहे. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 77 हजार 495 आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 38 दिवस झाला आहे.


महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा. 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.


मुंबईत लशींचा तुटवडा, केवळ 3 दिवस पुरेल इतकाच साठा


मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढचा साठा येईपर्यंत मुंबईत केवळ 1 लाख 85 हजार लसीच शिल्लक आहेत. यामध्ये कोविशिल्डचे 1 लाख 76 हजार 540 डोस तर कोवॅक्सिनचे केवळ 8840 डोस शिल्लक आहेत. त्यामुळे कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणा-यांची अडचण होण्याचीही शक्यता आहे. प्रत्यक्षात मुंबईची गरज ही 8 ते 10 लाख लशींच्या डोसची आहे. यापैकी 5 ते 6 लाख रिझर्व्हमध्ये साठा हवा  जर 5 लाखांपेक्षा कमी स्टॉक झाला तर त्याचा लसीकरण मोहिमेच्या वेगाला फटका बसतो. पुढचा साठा 15 एप्रिलला येणार, तोही अपुराच पडणार आहे.