पंढरपूर : राज्यात दर दिवशी कोरोनाचं संकट अधिक गडद होत असतानाच पंढरपूर आणि बेळगाव या भागांमध्ये पोटनिवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघांत आता बाजी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 


काय आहे पंढरपुरातील परिस्थिती ? 


दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून प्रमुख लढत भाजप उमेदवार समाधान अवताडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यातच होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यात भाजप व राष्ट्रवादी शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील , शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार शैला गोडसे , वंचित बहुजन आघाडीचे बिराप्पा मधुकर मोटे आणि सिद्धेश्वर अवताडे हे प्रमुख काही उमेदवार आहेत . यातील सिद्धेश्वर अवताडे हे भाजपच्या समाधान अवताडे यांचे चुलत बंधू असून या निवडणुकीत भाऊ बंधकी भाजपाला अडचणीची ठरायची शक्यता आहे . स्वाभिमानी , वंचित आणि अपक्ष शैला गोडसे यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढलेल्या आहेत. भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मोठ्या विजयाच्या वल्गना केल्या असल्या तरी हि निवडणूक अतिशय घासून व चुरशीची असल्याने येथे काट्याची टक्कर होणार आहे . एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार या 19 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार असून आज 524 मतदान केंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान केले जाणार आहे. यावेळी कोरोनाबाधित मतदारांना सायंकाळी 6 ते 7 यावेळेत मतदान करता येणार आहे .


Coronavirus Super-Spreaders | होम आयसोलेट असलेले रुग्णच बनत आहेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर


बेळगावमध्ये कोण मारेल बाजी ? 


बेळगाव लोकसभा मतदार संघातून चार वेळा निवडून येवून केंद्रात राज्य रेल्वे मंत्रिपद भूषावल्लेले सुरेश अंगडी यांच्या अकाली निधनामुळे बेळगाव लोकसभा पोट निवडणूक 17 एप्रिल रोजी होणार आहे.भाजपमध्ये अनेक जण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने भाजपने अखेर दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंग डी यांच्या पत्नी मंगला अंग डी यांना उमेदवारी घोषित केली.काँग्रेसने देखील आमदार सतीश जारकीहोळी यांना पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवले. महाराष्ट्र एकीकरण समितीने तरुण उमेदवार शुभम शेळके यांना उमेदवारी देवून पोटनिवडणुकीत राष्ट्रीय पक्षासमोर आव्हान उभे केले. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मराठी भाषिक एकत्र आले आणि त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रॅली काढून आणि जाहीर सभा घेवून मराठी भाषिकाना त चैतन्याचे वातावरण निर्माण केले.समिती उमेदवार शुभम शेळके यांना जनतेने लोकवर्गणी काढून प्रचाराला मदत केली. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी देखील समितीच्या उमेदवारासाठी झंझावाती प्रचार केला. भाजप हाय कमांडने तर ही लोकसभा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे अर्धे मंत्रीमंडळ प्रचारात गुंतले होते. 


मराठी भाषिकांना आपल्याकडे वळवण्यासाठी...


सीमाभागातील मराठी भाषिकांना आपल्याकडे वळवण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर सभा घ्यायला लावली होती.त्यानंतर दुसरे दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बेळगावात पत्रकार परिषद घेवून फडणवीस यांच्यावर टीका केली. दलित,अल्पसंख्यांक आणि परंपरागत काँग्रेस मतदारांवर काँग्रेसची भिस्त आहे.भाजपची भिस्त लिंगायत आणि मराठी मतांवर आहे. तेव्हा आता या निवडणुकीत बाजी कोण मारतं हे पाहणं मह्त्वाचं ठरणार आहे.