Chandrakant Patil : पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांची आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांत्वनपर भेट घेऊन दुःख व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी व वळीवडे येथील सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर काही वारकरी जखमी झाले होते. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांची तसेच जखमी वारकऱ्यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जुनोनी येथे अपघातात मृत्यू झालेल्या वळीवडे, ता. करवीर येथील सुनीता उत्तम पवार व गौरव उत्तम पवार व जठारवाडी, ता. करवीर येथील शारदा आनंदराव घोडके, सर्जेराव श्रीपती जाधव, सुनीता सुभाष काटे, शांताबाई जयसिंग जाधव, रंजना बळवंत जाधव यांचे कुटुंबिय व नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्या दु:खामध्ये सहभागी असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. तसेच जखमी वारकऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस करुन त्यांना धीर दिला.
सांगोल्यात भीषण अपघात
विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत काल सायंकाळी (31 ऑक्टोबर) कार घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा जणांचा जागीच, तर एका वारकऱ्याचा रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यू झाला. पाच वारकरी जखमी झाले आहे. जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
कार दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडलं
काल सायंकाळी सात वाजता ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी इथल्या बायपास रस्त्याजवळ आली असताना मिरजेकडून भरधाव वेगाने येणारी कार दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे गेल्याने सात जणांचा मृत्यू झाला. अपघात झालेली कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.