मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये अनेक घटना घडत आहेत. आत्तापर्यंत तिथे 7 आमदार आणि 2 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. उद्या देखील एक मोठी घटना घडणार असल्याचे वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले. उत्तर प्रदेशमध्ये दलित मजदूर, शेतकरी यांच्यावर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर असे संकेत दिसू लागले होते की, भाजप उत्तर प्रदेशमध्ये हरणार आहे, आता याचा परीणाम दिसू लागला असल्याचे मलिक यावेळी म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे तिथे काँग्रेसने इतर पक्षांसोबत यायला हवे असेही मलिक यावेळी म्हणाले.


उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला एक जागा देण्यात आली आहे. आणखी दुसऱ्या जागांबाबत देखील प्रफुल्ल पटेल अखिलेश यादव यांच्यासोबत चर्चा करत आहेत. उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस कमकुवत होत चालली आहे. शरद पवार यांनी म्हंटल होत की, भाजपच्या विरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं. आमची काँग्रेससोबत अनेक ठिकाणी युती आहे. मात्र आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने लक्ष्यात घ्यायला हवं आणि इतर पक्षासोबत यायला हवं असे मलिक यावेळी म्हणाले.


महाविकास आघाडीप्रमाणे गोवा विकास आघाडी करावी
गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत दिलं नव्हतं. पण काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे तिथं भाजपची सत्ता आली. त्यावेळी देखील जे राजकारण घडलं तेच आता पुन्हा एकदा गोव्यात होत आहे. आमची भूमिका आहे महाविकास आघडीप्रमाणे गोवा विकास आघाडी करावी. परंतू काँग्रेस सकारात्मक नाही. अपेक्षा आहे ते आमच्यासोबत गोव्यात येतील असा विश्वास यावेळी मलिक यांनी व्यक्त केला.


निवडणूक आयोगाने 5 राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्वच पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. कारण सध्याच्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील 2 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या मुद्यावरुन विरोधक सध्या भाजपव टीका करताना दिसून येत आहेत. 


जो पक्ष ज्या राज्यात मोठा आहे त्यांच्यासोबत निवडणूक लढायची असं आमचं ठरलं आहे. शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये 50 ते 100 जागा लढणार आहे, तो त्यांचा निर्णय आहे. मात्र, आम्ही सपासोबत जाणार आहोत आमचं ठरलं असल्याचे मलिक यावेळी म्हणाले. काल मंत्रिमंडळाने कामगार कायद्यात बदल करून आता सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा सरसकट निर्णय आहे. मात्र, मराठीसोबतच इतरही गुजराती, उर्दू,  इंग्रजी पाट्या लावण्याचा मुभा देण्यात आली असल्याचे मलिक म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या: