मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून पहिलाच दिवस एका वेगळ्याच कारणाने गाजला. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालत भास्कर जाधव यांना माफी मागायला लावली. पण आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नक्कल करताना दिसत आहेत. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "विधानसभेत अंगविक्षेप केले असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी करून हक्कभंग आणण्याची धमकी दिली. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत."
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदींवर टीका करताना डोळा मारला होता. तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली होती.
काय आहे प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करत राज्याचे मंत्री नितीन राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्यानं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच भडकले. माफी मागा म्हणत हक्कभंग आणण्याचा इशारा देखील विरोधी पक्षनेत्यांनी दिला. यावर दोन वेळा सभागृह स्थगित झाल्यानंतर अखेर भास्कर जाधवांनी माफी मागितली आणि विषयावर पडदा पडला.
यावर प्रतिक्रिया देताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, "मी ते पंतप्रधान असल्याच्या आधी बोललो आहे. पंतप्रधान झाल्यावर असं मी बोललो नाही. मी माझे शब्द मागे घेतो आणि अंगविक्षेप मागे घेतो." यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अंगविक्षेप मागे घेता येतो का? हे आम्ही सहन नाही करणार. माफी मागीतली पाहिजे. पंतप्रधान यांचा असा अवमान होणार असेल तर हक्कभंग आणला जाईल, त्यांनी माफी मागावी असं ते म्हणाले. त्यांनी अंगविक्षेप केल्याचं मान्य केलं आहे त्यांनी माफी मागितली पाहीजे."
यावर मी माफी मागू शकत नाही, मी शब्द मागे घेतले आहेत, असं भास्कर जाधव म्हणाले. गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी कामकाज स्थगित केलं.
संबंधित बातम्या :