पुणे : संग्राम थोपटे यांना मंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुणे काँग्रेस भवनावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच हल्लाबोल केला. पुण्यातील काँग्रेस भवनात जबरदस्त तोडफोड करण्यात आली आहे. तेथील खुर्च्यांची आणि टेबलांची तोडफोड केली. या ठिकाणी संग्राम थोपटे जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात घोषणाबाजी देण्यात आली. संग्राम थोपटे यांनी पक्षासाठी मेहनत दिली. संग्राम थोपटे आमचं आशास्थान आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं म्हणून आम्ही काँग्रेस भवन फोडलं असं युवा कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.


पुण्यातील काँग्रेस भवनचे कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. दोन मजली काँग्रेस भवनातील खिडक्या, खुर्च्या, टेबलची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी संग्राम थोपटेंच्या समर्थकांनी बाळासाहेब थोरात, संजय जगताप यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी काँग्रेस भवनावर धाव घेतली. आक्रमक झालेल्या संग्राम थोपटेंच्या कार्यर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Congress | काँग्रेसच्या संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्यानं समर्थकांचा राडा | ABP Majha



काँग्रेस भवनावर निषेधाचा बॅनर घेऊन ते दाखल झाले आणि त्यांनी काँग्रेस भवनाची तोडफोड केली. संग्राम थोपडेंवर अन्याय होत असेल तर आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली आहे. संग्राम थोपटे प्रामाणिकपणे काँग्रेससोबत राहिले. आमच्यावर अन्याय झाला आहे हे आम्ही सहन करणार नाही. बाळासाहेब थोरात यांनी दिलेला शब्द पाळला नाही. तिसऱ्यांदा संग्राम थोपटे निवडून आले आहेत. नवीन लोकांना मंत्रिपद दिली जातात. संयमाने आम्ही त्यांना सांगितले. त्याची दखल घेतली नाही आमच्या संयमाचा बांध सुटला आहे, असे संग्राम थोपटेंच्या समर्थकांनी सांगितले.