Satej Patil : महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करुन झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. त्यानंतर यावर माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरक्षेच्या बाबतीत मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नसल्याचे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केलं आहे. शंभूराज देसाई असू किंवा मी असू हे निर्णय घेत नसल्याचे स्पष्टीकरण देखील पाटील यांनी दिलं आहे.


सुहास कांदेंच्या आरोपात तथ्य वाटत नाही


एसआयडीचा रिपोर्ट आल्यानंतर तशी सुरक्षा दिली जाते. सुरक्षेच्या बाबतीत मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नसल्याचे सतेज पाटील म्हणाले. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असते. आदी रिपोर्ट पाहिला जातो आणि मग त्याबाबत निर्णय घेतला जातो असेही पाटील यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणतीही सूचना आली असेल यात तथ्य वाटत नाही. उलट एकनाथ शिंदे त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांना जास्त सुरक्षा होती असेही पाटील म्हणाले.


खासदार संजय मंडलिक जाताना भेटून गेले


जे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले त्यांना उमेदवारी कशी दिली जाणार याबाबत स्पष्टता नाही. तो शिवसेना पक्षाचा विषय आहे. त्यातील काही लोकं परत देखील जाऊ शकतात असेही पाटील म्हणाले. यापुढे निवडणुका तिन्ही पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळ्या लढवणार याचा निर्णय वरिष्ठ घेतील असेही पाटील म्हणाले. दरम्यान, शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हे जाताना भेटून गेले. त्यांना मी जाऊ नका अशी विनंती केली होती असे पाटील म्हणाले. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात ते आमच्याबरोबर राहतील अशी आशा आहे. संजय मंडलिक यांनी घेतलेला निर्णय दुःख देणारा आहे. सहकारात एका प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही एकत्र येऊन लढलो. 40 आमदार आणि 12 खासदारांना नेमकं काय मिळणार हा प्रश्नच असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.


राज्याला किमान मदत आणि पुनर्वसन मंत्री तरी द्या 


पुढच्या महिना दोन महिन्यात सगळ्याच गोष्टी बाहेर येतील असेही पाटील म्हणाले. देशात कधीच असं सूडाचं राजकारण केले नाही. सध्या विरोधी पक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसनं भारत जोडो अभियान सुरु केलं आहे, त्यानंतर लगेच कारवाई केली जात असल्याचे पाटील म्हणाले. मात्र, अशा दबावाला काँग्रेस कधीही बळी पडणार नसल्याचं पाटील यांनी सांगितलं. राज्याला किमान मदत आणि पुनर्वसन मंत्री द्या अशी मागणी देखील त्यांनी केली. कुणाला किती मंत्रिपद मिळणार याची माहिती नाही. सरकार संकट काळात कुठं मदत करतय असं दिसतं नसल्याचे देखील पाटील यावेळी म्हणाले. सरकार नंतर केवळ पंचनामे पाहायला येणार आहे का? असा सवाल देखील पाटील यांनी केला.


नेमकं काय म्हणाले होते सुहास कांदे


महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. या दरम्यान गडचिरोलीतून नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर गृहविभागाने शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला. एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास त्यावेळेस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करुन झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा दावाही सुहास कांदे यांनी केला आहे. 


एका मराठी माणसाला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिली गेली, तरीदेखील त्यांची सुरक्षा व्यवस्था का नाकारण्यात आली. मात्र, जे हिंदुत्वाविरोधात होते, त्यांना सुरक्षा व्यवस्था का दिली असा सवालही त्यांनी केला.  याकूब मेननच्या फाशीला विरोध करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या अस्लम शेख, नवाब मलिक यांच्यासोबत सत्तेत बसायचे का? असा सवालही त्यांनी केला. 


महत्त्वाच्या बातम्या: