Bhandara Gondia Loksabha: आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) रणधुमाळीला पूर्व विदर्भापासून (Vidarbha) सुरुवात होणार असून त्याकरिता आता अवघे 5 दिवस शिल्लक राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर विदर्भात जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून पक्षातील दिग्गजांनीही प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांना साद घातली आहे. अशातच पूर्व विदर्भातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उद्या भंडाऱ्याच्या साकोली येथे प्रचार सभा होत आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा विदर्भात झाल्या असून उद्या पुन्हा भाजपचे स्टार प्रचारक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या भंडाऱ्यात येणार आहेत. आता या दौऱ्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी भाजपवर टीकास्त्र डागले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विदर्भात येत आहे. त्यांचे देखील स्वागत आहे. मात्र मागच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साकोलीला प्रचारासाठी आले होते, त्यावेळी त्यांचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने हरले होते. आता अमित शहा प्रचारासाठी येत आहेत. तर यावेळीही त्यांचे उमेदवार हरतील, अशा शब्दात नाना पटोले यांनी अमित शहांच्या विदर्भ दौऱ्यावर निशाना साधला आहे. तर चंद्रपुर येथे पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये लोक पैसे देऊन आणली असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला आहे. 


पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी लोकांना पैसे देऊन आणलं


महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची आज भंडाऱ्याच्या साकोलीत सभा होत आहे. तर उद्या याच मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या प्रचार सभा होत आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा विदर्भात झाल्यानंतर आज काँग्रेसने राहुल गांधी यांची सभा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघात आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधीच्या सभेला संपूर्ण विदर्भातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.


सोबतच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विदर्भात येत आहे.  त्यांचे देखील आम्ही स्वागत करतो. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा चंद्रपूर आणि नागपूर येथे पार पडली. यावेळी या सभेमध्ये जे लोक बोलावले होते त्यांना पैसे देऊन आणल्या गेले होते. पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होताच अनेकांनी काढता पाय घेतला. असेच चित्र उद्याच्या सभेत देखील बघायला मिळेल, असे म्हणत नाना पटोले यांनी अमित शाहांच्या विदर्भ दौऱ्याची खिल्ली उडवली आहे.