व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाचताना, गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कामाचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आपल्या पत्नीसह एका गाण्याचं चित्रीकरण केलं आहे. टी सीरीजतर्फे यूट्यूबवरुन हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
VIDEO : जेव्हा श्री आणि सौ मुख्यमंत्री अभिनय करतात!
या अगोदरही अशा तऱ्हेचे काही व्हिडोओ टी सीरीज कंपनीतर्फे प्रकाशित करण्यात आले होते. मात्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि पोलिसांना नाचता-गाताना दाखवल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.
काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न
1. टी सीरीज या कंपनीशी शासनाचा संबंध आहे की मुख्यमंत्र्यांचे कौटुंबिक नाते आहे? यामधील आदान प्रदान काय आहे?
2. सदर व्हिडीओमध्ये महाराष्ट्र शासन अथवा माहिती व जनसंपर्क संचालनालयाचा कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे शासनाचा सदर कंपनीशी करार झाला आहे का? असल्यास त्या कराराचा मसुदा जाहीर करावा.
3. जर शासनाशी संबंध असेल तर हीच कंपनी का निवडली, त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली गेली?
4. मुख्यमंत्री, अर्थमंत्री व अधिकाऱ्यांनी या व्हिडीओसाठी मानधन घेतले आहे का? कलाकारांचे मानधन कोणी दिले? आणि या व्हिडीओचा खर्च कोणी केला?
5. शासकीय अधिकाऱ्यांना सदर व्हिडीओमध्ये काम करण्याचे आदेश कोणी दिले? सदर काम त्यांच्या कार्यकक्षेत येते का?
6. वर्षा हे शासकीय निवासस्थान चित्रीकरणासाठी वापरण्याची परवानगी कोणी दिली?
7. सदर व्हिडीओ खासगी असेल तर अशा खासगी प्रकल्पात अधिकाऱ्यांनी स्वखुशीने काम केले की, त्यांना काम करण्याचे आदेश दिले?
8. स्वतःच्या अतिव्यस्त कार्यक्रमातून व अतिमहत्त्वाच्या जबाबदारीतून वेळ काढून मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी या व्हिडीओच्या चित्रीकरणासाठी वेळ दिला तसेच इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांचे काम बाजूला ठेवून यामध्ये समाविष्ट केले गेले. याचा अर्थ सदर व्हिडीओच्या माध्यमातून मुंबईच्या नदीसारखे जटील प्रश्न सोडवले जाऊ शकतात अशी मुख्यमंत्र्यांची धारणा आहे का?
9. असल्यास राज्यात 13 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्या रोखण्यासाठी मंत्रालयात जाळ्या लावाव्या लागल्या. अशा व बेरोजगारी, कुपोषण, कोलमडलेली अर्थव्यवस्था, वाढलेली महागाई इत्यादी सारख्या महत्त्वाच्या विषयांवर शासन असेच व्हिडीओ बनवणार आहे का?
10. अशा व्हिडीओमध्ये काम करण्याकरता त्या-त्या विषयाशी संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी व मंत्री यांना अभिनयाचे व नृत्याचे प्रशिक्षण सरकार देणार आहे का?