सांगली : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आज अनेक ठिकाणी कोणी पुढे येत नाही, नातेवाईकांनीही पाठ फिरवल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र सांगलीमध्ये महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपल्या एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेला स्वतःला अग्नी दिला.


मिरजेत कोरोना रूग्णांच्या चितेला अग्नी देणाऱ्या महापालिकेच्या एका स्वच्छता निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली. ज्या मध्ये सुधीर कांबळे यांचा मृत्यू झाला. गेल्या 3 महिन्यापासून कांबळे हे मिरज-पंढरपूर रोडवरील स्मशान भूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराचा काम करत होते. जवळपास 300 हून अधिक कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्यावर कांबळे आणि त्यांच्या टीमने अंत्यसंस्कार करण्याबरोबर चितेला अग्नी देण्याचे काम केलं. काही दिवसांपूर्वी कांबळे यांना हे काम करताना कोरोना लागण झाली आणि त्यात त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले. आता कोरोना रुग्णांच्या चितेला अग्नी कोण देणार ? हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता.


महापालिका क्षेत्रात ही गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस युद्धपातळीवर नियंत्रण आणि रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहेत. हे करताना आपल्या एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यानंतर विशेषत: कोरोना योद्धा म्हणून कोरोना रुग्णांच्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा मृत्यू आयुक्त नितीन कापडणीस यांना जिव्हारी लागला. आणि अशा या परिस्थितीमध्ये आयुक्त नितीन कापडणीस हे आपल्या कर्मचारी असणाऱ्या सुधीर कांबळे यांच्या अंत्यसंस्कारासाठी थेट कोरोना रुग्णांचे अंत्यविधी पार पडणाऱ्या मिरज शहरातील पंढरपूर रोड वरील स्मशानभूमीत जाऊन पोहचले आणि आयुक्त कापडणीस यांनी त्या ठिकाणी सुधीर कांबळे यांच्या चितेला अग्नी दिली.


खरंतर आयुक्त म्हणून पालिकेच्या एका सामान्य कर्मचाऱ्याच्या चितेला अग्नी देण्याची ही पहिलाच घटना म्हणावी लागेल. एक उच्च अधिकारी खरतर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या अंत्यविधीलाही हजेरी लावतात का प्रश्न आहे? आणि अशा आपत्ती काळात तर ते अश्यक्य आहे. मात्र माणुसकीची जाण असलेल्या आयुक्त नितीन कापडणीस यांनी मृत्यू पावलेला कर्मचारी आपल्या परिवारातला सदस्य असल्याची भावना ठेवून अंत्यसंस्काराला केवळ उपस्थितीत न लावता थेटे चितेला अग्नी दिला. तसेच कोरोनाच्या काळात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या सांगली महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आयुक्त नितीन कापडणीस यांच्या पुढाकारातुन महापालिकेकडून प्रत्येकी दहा लाखाची मदत देखील करण्यात आली.