नागपूर : तुम्हा-आम्हाला सुन्न करणारी आणि सरकारी नोकरशाहीच्या निर्लज्जपणाच्या चिंधड्या उडवणारी बातमी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पीडित कुटुंबीयांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भेट नाकारण्यात आली आहे.


विधानभवन प्रवेशासाठी आवश्यक असलेली प्रवेश पत्रिका नसल्याची सबब देत पीडित कुटुंबाची भेट नाकारण्यात आली. खुलताबादमध्ये 6 वर्षीय चिमुरडीवर वस्तीतल्याच एका इसमाने 28 जूनला अत्याचार केला. मात्र सुस्तावलेल्या पोलिसांना तपासासाठी 2 महिने लागले.

धक्कादायक म्हणजे, तपासातील अक्षम्य हलगर्जीपणामुळे 20 दिवसातच आरोपीला जामीनही मिळाल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केलाय. पीडित मुलीला अजूनही कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे संतापलेल्या कुटुंबीयांनी विधीमंडळाबाहेर ठिय्या मांडला.

दरम्यान विधीमंडळाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी पीडित कुटुंबियांना गृहविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भेटीचं आश्वासन दिलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पीडित कुटुंबाच्या भेटीसाठीही वेळ नाही का? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.