मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या, सध्या गाजत असलेलं कंगना प्रकरण आणि त्यावरुन सुरु असलेलं राजकारण तसंच मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कंगनावर काय बोलणार?
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातून समोर आलेलं ड्रग्ज प्रकरण आणि त्यावर वक्तव्य करत महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना रनौत सध्या चर्चेत आहे. कंगनानं अनेकदा मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं आहे. काल तर तिनं एक चित्र शेअर केलंय. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई दिसत आहेत. यात राणी लक्ष्मीबाईंच्या रुपात कंगना दिसत आहे. तर या चित्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रावणाची उपमा दिली आहे. त्यात त्यांना दहा तोंडं दाखवली असून मागे जेसीबी दाखवला आहे. बीएमसीकडून कंगनाच्या कार्यालयाचं अनधिकृत बांधकाम तोडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला होता. तिनं काही वेळा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी करत देखील टीका केली होती. ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाया रचला, तिच विचारधारा विकून शिवसेना सत्तेसाठी सोनिया सेना बनली आहे. असं कंगनानं म्हटलं होतं. वडिलांच्या चांगल्या कर्मामुळं तुम्हाला धनदौलत तर मिळू शकते मात्र आदर तुम्हाला स्वत: कमवावा लागतो. माझं तोंड बंद कराल मात्र माझ्यानंतर शंभर जण तो आवाज लाखों लोकांपर्यंत पोहोचवतील. किती तोंडं तुम्ही बंद करणार? कुठवर सत्यापासून दूर पळणार. तुम्ही फक्त वंशवादाचं एक उदाहरण आहात, बाकी काही नाही, असं कंगनानं एकेरी भाषा वापरत ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
मराठा आरक्षणावर काय बोलणार?
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अत्यंत संवेदनशील अशा मराठा आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाची वैधता ठरवण्यासाठी आता प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाणार आहे. मात्र, त्याचवेळी मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगितीही देण्यात आलीय. या निर्णयाचे राजकीय पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. राज्यातून मराठा संघटना आक्रमक होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आज काय बोलणार याकडेही लक्ष लागून आहे. मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी 11 सप्टेंबर रोजी म्हटलं होतं. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना आणि राज्यातील आरोग्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा दहा लाखांच्या वर गेला आहे. राज्यात तीस हजारांच्या जवळपास लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्य कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात पाचव्या स्थानी आलं आहे. दरम्यान राज्यात बेड न मिळणे, अॅम्युलन्स वेळेवर न मिळणं, ऑक्सिजनची कमतरता आणि आरोग्य सुविधांबाबत अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळं या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडेही लक्ष लागून आहे.