महाराष्ट्राच्या हिताची बाब असेल तर शरद पवार यांनी मतांची चिंता कधीच केली नाही. वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि चुका दुरुस्त करणारे शरद पवारच आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
अमरावतीत शरद पवारांचा सर्वपक्षीय जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर आयोजित सत्काराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अनेक सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.
''कपटी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा''
भारताच्या राजकारणामध्ये पक्षाच्या पलीकडे जाऊन मैत्री करणारे कमी नेते आहेत. शरद पवार त्यातीलच एक आहेत. राजकीय पक्षांमध्ये संवाद महत्त्वाचा असतो. पवारांशी राजकीय मतभेद असतील, पण राज्याच्या हिताचा विषय असेल तर ते स्वतः फोन करुन सांगतात. उपाययोजना सुचवतात. हा दिलदारपणा असावा. स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक हा अत्यंत चांगला असतो, तशा प्रकारचे दिलदार विरोधक पवार आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र याचा चुकीचा अर्थ लावू नका, असं सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.
''कृषी क्षेत्रात पवारांचं योगदान अमुल्य''
शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात शेती क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम झालं. पवारांना संरक्षण खातं सहज मिळालं असतं. मात्र त्यांनी दहा वर्षे कृषी मंत्रालय सांभाळलं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या कारकीर्दीचं कौतुक केलं.
''कर्जमाफीसाठी पवारांचं मार्गदर्शन''
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही. मात्र सध्या कर्जमाफीची अत्यंत गरज होती. सरकारने जेव्हा कर्जमाफीचा निर्णय घेतला तेव्हा पवारांना फोन केला. चर्चेसाठी त्यांनी दिल्लीला बोलावलं. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचेही नेते होते आणि भाजपचेही होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या काही मागण्या पवारांनाही मान्य नव्हत्या. राज्याचा विचार करत कर्जमाफीबद्दल शरद पवारांनी मार्गदर्शन केलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
''पवार राजकारणाच्या, पक्षाच्या पलीकडे पाहतात''
आमचा डीएनएच विरोधी पक्षाचा आहे. विरोधी पक्ष कसा काम करतो ते आम्हाला माहिती आहे. सत्तापक्ष काय असतो ते आत्ता कळलं. विरोधात असताना अवास्तव मागण्यांनी लोक खुश होतात आणखी काही नाही. पण शरद पवार नेहमी राजकारणाच्या आणि पक्षाच्या पलीकडे पाहतात. प्रत्येक राज्यात एकतरी अशी व्यक्ती असली पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
VIDEO : मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण