मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस (Maharashtra Monsoon Session) चांगलाच गाजला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याची आज चर्चा झाली. तुमचा सर्व प्रवास मला माहिती आहे, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) तुमच्यावर 'करुणा' दाखवली असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "धनंजय मुंडे ही तिकडे किती ओरडत होते. ते एवढ्या जोरात ओरडत होते की जसे मूळचे शिवसैनिक वाटत होते. तुमचा घसा खराब होईपर्यंत ओरडला. तुमचा सर्व प्रवास मला माहिती आहे. त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रेम, करुणा, दया दाखवली, त्यामुळे हे झालं. पण ती परत-परत ती दाखवता येणार नाही."


शिंदेंच्या बोलण्यात करुणा हा शब्द


मुख्यमंत्री शिंदेंच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. त्यांच्या बोलण्यामध्ये करुणा हा शब्द आल्यानेच सभागृहातील सत्ताधारी सदस्यांमध्ये हास्याची ही ललकारी उडाली. आज विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भलतेच फॉर्मात होते. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या भाषणाचीच आठवण आली. पण शिंदेंचे आज मुख्य टार्गेट होते ते राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर धनंजय मुंडेंनी भाजप आणि शिंदे गटाला उपरोधिक टोले हाणले होते. त्याची सव्याज परतफेड शिंदेंनी आज केली. 


देवेंद्र फडणवीस नाममात्र हसले


पण मुख्यमंत्री शिंदे जेव्हा हे वक्तव्य करत होते तेव्हा कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये असलेले चेहरे जास्त बोलके होते. मुख्यमंत्री शिंदेंच्या मागे असलेले संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे तर जोरजोरात हसताना दिसत होते. पण शेजारी बसलेले देवेंद्र फडणवीस मात्र नामामात्रच हसले. पण यामध्ये सगळ्यात अडचण झाली ती विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची.


आज विधानसभेतही धनंजय मुंडे यांनी शिंदे आणि फडणवीसांना निशाण्यावर  घेतलं होतं. कदाचित मुंडेंचे हेच टोमणे मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात गेले आणि मग शिंदेंनी मुंडेंवर कोणतीही करुणा दाखवली नाही.


कोण आहेत करुणा शर्मा?


करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे हे आपल्या मुलांचे वडील असल्याचा दावा केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून धनंजय मुंडे हे आपल्यासोबत राहात असल्याचा दावाही करुणा शर्मा यांनी केला होता. करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर धनंजय मुंडेंनी एक फेसबुक पोस्ट लिहून आपल्या संबंधांची कबुली दिली होती. 


त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. पण धनंजय मुंडे हे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र असल्याने त्यांनी मुंडेंना वाचवल्याची चर्चा होती. दरम्यान, करुणा शर्मा यांनी आज विधानभवनातल्या कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गेल्या काही काळात करुणा शर्मा यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांसंबंधी ही भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे.