मुंबई : राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन (Ladki bahin yojana) सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. राज्य सरकारची ही योजना गावागावात लोकप्रिय झाली असून 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील आमदार व पदाधिकाऱ्यांनीही शिबिरांचे आयोजन करुन लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीही या योजनेवरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आपल्या यावरुन टीकाही करतात. ही योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आणल्याचंही ते म्हणाले होते. आता, या योजनेवरुन टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जशास तसं उत्तर दिलं आहे.   


आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना किंवा लाडका भाऊ योजना, वीज पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज दिली. तसेच, वयश्री योजना सुरू केली आहे. या योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या नाहीत. या योजनाचं प्रिपरेशन आठ ते 10 महिन्यांपासून सुरू होतं. निवडणुका आणि योजना याची आम्ही सांगड घालत नाही. विकास आणि कल्याण याची आम्ही सागंड घालतो, असे प्रत्त्युत्तर मुख्यमंत्री शिंदेंनी दिले. तसेच, घटनाबाह्य सरकार आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून टोला लगावणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांवरही शिंदेंनी निशाणा साधला. 


जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात ते लाडकी बहीण योजनेचे बॅनर कसे लावतात. हे दुट्टपी आहेत, यांना फक्त घेणं माहिती आहे, देणं नाही. पण, आमचं सरकार देणारं आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच, मोगलांना जसे संताजी धनाजी पाण्यात दिसायचे, तसा त्यांना मी दिसतो का काय. महायुतीचं सरकार झालं हे त्यांना अजून हजम होत नाही. त्यांना बसता उठता, झोपेतही मीच दिसतो. ते सांगायचे सरकार पडेल आता 2 वर्ष होऊन गेली. सरकार मजबुतीने उभं आहे, असेही शिंदेंनी म्हटले. 


बहिण लाडकी, विरोधकांना भरली धडकी


विरोधीपक्षाने महाविकास आघाडीने जे प्रकल्प थांबवले ते आम्ही सुरू केले. नवीन प्रकल्प सुरू केले, रखडलेल्या प्रकल्पांना चालना दिली. आज सगळीकडे देशभरात महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे प्रकल्प सर्वाधिक सुरू आहेत. एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजनांमुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागलं आहे, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 'बहिण लाडकी आणि विरोधकांना भरली धडकी' अशा प्रकारचं झालेलं आहे. त्यामुळेच, योजना रद्द करण्यासाठी ते कोर्टात गेले, मात्र न्यायालयाने माझा लाडक्या बहिणींच्या बाजूने न्याय दिला, असे म्हणत विरोधकांना टोला लगावला. 


माझी बहीणही अर्थव्यवस्थेचा बॅकबोन


सरकार जे आनंदाचा शिधा देतो, त्याच्याविरोधातही कोर्टात गेले. गरीबांच्या हाता तोंडाचा घास हिसकावण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. कोविडमध्ये तर यांनी तो घास हिसकावला. खिचडी हिसकवली, आता लाडकी बहिण आणि भावाच्या तोंडाचा घास हिसकावण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. त्यामुळे मी माझा बहिणींना नेहमी सांगतो या कपटी सावत्र भावापासून सावध रहा, अशा शब्दात शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला. भीक घेऊ नका, विकले जाऊ नका, लाच घेऊ नका. कुठले शब्द वापरता बहिणींसाठी तुम्हाला 1500 रुपयाचं मोल नाही. मात्र, या दीड हजारात माझी बहीण घरातलं काही काम करू शकेल तेच पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेतही येतील. माझी बहीणही अर्थव्यवस्थेचा बॅकबोन आहे. त्यानंतर आम्ही मोफत सिलेंडरची योजना आणली. परत दीड हजाराची योजना आणली. त्यामुळे विरोधकांना मी नाही माझा लाडक्या बहिणीच उत्तर देतील, असेही शिंदेंनी म्हटले. 


संस्कृतीला बाधा येता कामा नये - शिंदे


राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भाने सर्वपक्षीय बैठक आम्ही बोलावली. त्याला संघ्याकाळपर्यत सर्वचजण येणार येणार म्हणाले, परंतु आले नाहीत. दुर्दैवाने राज्यात दोन समाजात जो संघर्ष सुरू आहे तो थांबला गेला पाहिजे, अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे. पवारसाहेबांनाही मी सांगितलं आपल्या राज्यात असं कधी पहायला मिळालं नव्हतं.  निवडणुका येतात जातात, सरकार येतात-जातात या महाराष्ट्राच्या संस्कृतीला बाधा येता कामा नये. जे काही या समाजासाठी करता येईल. जे काही हे वातावरण शांत करण्यासाठी करता येईल, तो सर्व प्रयत्न करीन. पवार यांच्याशी माझी चर्चा झाली आहे, जे काही शांत करण्यासाठी करावं लागेल ते आम्ही करू, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले. 



हेही वाचा


मनसेचा राडा... मनसैनिकांनी आता टोलनाका फोडला; गडकरींच्या बालेकिल्ल्यातच खळखट्याक