यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गणेश पर्व अत्यंत आनंदाचं पर्व आहे. देशात -विदेशात हा सण साजरा होतो. मात्रा मराठी माणूस जिथं असतो तिथं या सणाचा उत्साह वेगळाच असतो. गणरायाला एवढीच प्रार्थना की सर्वांना आशीर्वाद द्यावा. महाराष्ट्रावरील संकट दूर करण्यासाठी आणि पूर पीडितांना दिलासा मिळावा यासाठी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बाप्पांचा आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी राहिला आहे त्यामुळे स्वतःसाठी काही मागण्याची वेळच आली नाही, असे फडणवीस म्हणाले. पुढच्या वर्षी वर्षावर आपणच गणपती बसवणार का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी 'कोई शक है क्या?' अशा शब्दात उत्तर दिलं.
दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. मुलाच्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही. ईडीचं संकट बाप्पा दूर करेल अशी प्रतिक्रिया मनोहर जोशी यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही नागपूरच्या घरी बाप्पा विराजमान झाले. याशिवाय उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सेवासदन या सरकारी निवासस्थानी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. त्याआधी वाजत गाजत गणपती बाप्पांचा मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. ज्यात तावडेंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. तर परळीत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्या घरीही बाप्पाची प्रतिष्ठापना झाली.