मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेत रमी खेळण्याच्या व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. माणिकराव कोकाटे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे, पण त्यांनी काहीही सांगितलं असलं तरी ते आमच्यासाठी भूषणावह नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावरुन नाराजी व्यक्त केली.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली.

Manikrao Kokate Video : आमच्यासाठी ते भूषणावह नाही

मुख्यमंत्री म्हणाले की, जे घडलं ते अतिशय चुकीचं आहे. विधान भवनामध्ये अशा प्रकारची गंभीर चर्चा सुरू असताना, आपलं काम नसलं तरी आपण गंभीर असणं आवश्यक आहे. साधारणपणे सभागृहात कामकाजाचे कागद वाचता, किंवा इतर काही वाचता तर ते ठिक आहे. पण रमी खेळणे हे काही बरोबर नाही. कोकाटे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी काहीही सांगितलं तरी ते काही आमच्यासाठी भूषणावह नाही.

माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात?

ऐरवी आपल्या बेताल वक्तव्यामुळे अजितदादांना आणि पक्षाला अडचणीत आणणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सध्या चर्चेत आहेत ते सभागृहातल्या ऑनलाईन रमीमुळे. ऑनलाईन पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा पत्ता कट होणार का असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे.

कारवाईचा चेंडू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अजित पवारांच्या कोर्टात टोलावल आहे. शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्यांचं वागणं अयोग्य असल्याचं तटकरेंनी म्हटलं. तटकरेंचं हे वक्तव्य म्हणजे माणिकराव कोकाटेंवर कारवाईचे संकेत मानले जात हेत. आता अजित पवार माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार की त्यांची खुर्ची शाबूत राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

जाहिरात स्किप करत होतो, कोकाटेंची सारवासारव

मी सभागृहात रमी खेळत नव्हतो तर यूट्यूब पाहत असताना ऑनलाईन आलेली जाहिरात स्किप करत होतो, अशी सारवासारव माणिकराव कोकाटेंनी काल केली होती. मात्र माणिकराव कोकाटेंचा दावा खोडून काढण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी आज नवीन व्हिडीओ एक्स पोस्ट केलाय. ज्यात माणिकराव कोकाटे ऑनलाईन जुगार खेळताहेत असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

ही बातमी वाचा: