पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय वारीही केली. आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे भोजन, कल्याणराव काळे यांच्याकडे चहा, तर काँग्रेस आमदार भारत भालके यांच्याकडे फडणवीसांनी फराळ करत राजकीय गणितं मांडली.


विधानसभेचे वारे काही दिवसात वाहू लागणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर दौऱ्यात चाणाक्षपणा दाखवला. अनेकांना खुश करत राजकीय गणितं मजबूत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आषाढी एकादशीच्या दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री दशमीला सोलापुरात उतरले आणि तिथेच काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार भारत भालके स्वागताला हजर होते.

यानंतर पंढरपूरमध्ये विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्या बाजार समितीमधील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. परिचारकांकडे रात्री भोजनाचा आणि पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या गायनाचा सपत्नीक आस्वाद घेतला. या कार्यक्रमात माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांची उपस्थिती आश्चर्यकारक होती. याच ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेतेही सहभागी झाले होते.

एकादशीला विठुरायाच्या पूजेनंतर सकाळी पहिल्यांदा काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या कल्याणराव काळे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी चहापान केले. यावेळी बोलताना काळे यांनी केलेल्या मागण्या पाहता हा चहा आपल्याला फारच महागात पडल्याची मिश्किल कोटीही त्यांनी केली. याच कार्यक्रमात माढ्याचे नूतन खासदार रणजित निंबाळकर यांनी बारामतीने नेलेले हक्काचे पाणी परत आणल्याचे सांगितले. या पाण्याचे वाटप आता सांगोला, माढा, पंढरपूरसह गरज असलेल्या भागाला करणार असल्याचं म्हणत बारामतीकरांनाही टोला लगावला.

काळे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी थेट काँग्रेस आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी जाऊन फराळाचा आस्वाद घेतला. नुकतेच भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत भाजपच्या संपर्कात असलेल्या आमदारांची त्यांनी भेट घेतली. या यादीत भालके यांचंही नाव चर्चेत असल्याने विखे पाटील मुख्यमंत्र्यांना भालके यांच्या निवासस्थानी घेऊन गेले. यावेळी भालके यांनी आपण स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याने मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिल्याचे सांगत काही राजकीय चर्चा करायची असती, तर त्या गुप्त बैठकीत केली जाते आणि यासाठी मुंबईत भरपूर जागा असल्याचं सांगत सुरु असलेल्या चर्चेला पुष्टी दिली.