जालना: जालन्यात मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. जिल्हा परिषद सदस्य आणि इतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला, दरम्यान पोलिसांनी मज्जाव केल्याने पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावलं
जालना येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील निदर्शने केली. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची तात्काळ मदत जाहीर करावी यासह अन्य मागण्यांसाठी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसले होते. दरम्यान पोलिसांनी त्यांना अटकाव केला, यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली. यावेळी पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावत 15 ते 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा जिल्हा वकील संघाकडून जाहीर निषेध
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा जिल्हा वकील संघाकडून जाहीर निषेध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात जाताना जिल्हा न्यायाधीशांची गाडी अडवल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. बैठकीसाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. याच रस्त्यावर जिल्हा न्यायालय असल्याने पोलिसांनी जिल्हा न्यायाधीशांची गाडी अडवून वकिलांना देखील न्यायालयाकडे जाऊ दिलं नाही, असा आरोप जिल्हा वकील संघाने केला आहे. परिणामी जिल्हा न्यायालयाचं काम दिवसभर बंद होतं. त्यामुळे जिल्हा वकील संघाने मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याचा निषेध केला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दुष्काळाच्या आढाव्यासाठी होता की सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी होता? असा प्रश्न वकीलांनी केला आहे.
जालना दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प योजनांचा आढावा घेतला गेला. यात शासन निर्णय आणि नियोजन विभागाच्या नमूद विषयांचा आढावा घेतला गेला. याशिवाय, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या सोबत इतर महत्वाच्या विभागांची आढावा बैठक घेतली.
दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा
- जिल्ह्याचा दुष्काळ आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला
- शेतीचा पावसाअभावी परिणाम झालाय असं दिसतंय
- बाजरीमध्ये 30 टक्के घट, सोयाबीन आणि कापसात 40 टक्के घट
- जालना जिल्ह्यातील मंठा वगळता 7 तालुक्यात दुष्काळ जाहीर
- मनरेगाच्या कामांचा आराखडा करण्याचे आदेश
- प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत, जालना जिल्ह्यात 4 हजार 176 घरे पूर्ण
- जलयुक्त शिवार अंतर्गत, जालना जिल्ह्यात 900 गावे हाती घेतली होती, त्याचे काम वेगाने होत आहे
- जिल्ह्यात 7 हजार शेततळ्याच उद्दिष्ट पूर्ण
- गाळमुक्त धरण आणि गळयुक्त शिवार, हे NGO ला हाताशी धरून व्यापक काम हाती घेणार
- जालना जिल्ह्यासाठी 4 हजार 747 पैकी 336 विहिरींचे काम पूर्ण
- लोडशेडिंग तात्पुरती,दिवाळीच्या काळात लोडशेडिंग होणार नाही
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, 'स्वाभिमानी'ला हुसकावले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Nov 2018 03:49 PM (IST)
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला, दरम्यान पोलिसांनी मज्जाव केल्याने पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या बाचाबाची झाली यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -