मुंबई : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारमध्ये खलबतं सुरु झाली आहेत. यासाठी आज (गुरुवारी) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध नेत्यांशी संवाद साधणार आहेत. दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी वैयक्तिक भेटीगाठी सुरु केल्या आहेत.


मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री (गुरुवारी) मुख्यमंत्री एक मोठी बैठक घेणार आहेत.  सरकारमधील मंत्र्यांबरोबर खास करुन मराठा मंत्री, तसंच भाजपातील काही ठराविक मराठा आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे.

रात्री उशीरापर्यंत ही बैठक चालणार असून, सध्याची कोंडी फोडण्यासाठी  भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.

चंद्रकांत पाटलांचाही पुढाकार

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी काही लोकांना चर्चेसाठी बोलावण्यात आलं होतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्ग कसा काढायचा, कोंडी कशी फोडायची याकडे लक्ष दिलं जात आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलनाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. समाजाचा रोष लक्षात घेऊन विविध पक्षातील आमदारांनी राजीनामे दिले आहेत.