Maharashtra Karnataka ST Bus : महाराष्ट्रातून (Maharashtra) कर्नाटकात जाणारी तसंच कर्नाटकातून (Karnataka) महाराष्ट्रात येणारी एसटी बस (ST Bus) सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तणावाचे वातावरण निवळेपर्यंत दोन्ही राज्यांनी बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई (Basavraj Bommai) यांनी जत तालुक्यातील गावांची मागणी केल्यामुळे कर्नाटकच्या बसला दौंड (Daund) इथे शाई फासण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राच्या बसला कलबुर्गी (Kalaburagi) इथे काळे फासण्यात आले. या साऱ्यांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद केली आहे.


कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील जत तालुक्यातील काही गावांवर आपला दावा सांगितला. महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून दोन्ही राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच दोन्ही राज्यात बसला काळे फासण्याच्या घटना घडल्याने सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांनी बस सेवा बंद केली आहे. परंतु या निर्णायामुळे नोकरी, उद्योगाच्या निमित्ताने कर्नाटक आणि महाराष्ट्रात दररोज ये-जा करणाऱ्या लोकांची मोठी अडचण झाली आहे 


दौंडमध्ये मराठा महासंघाकडून कर्नाटकच्या एसटीला काळे फासले
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जत कर्नाटकचे असे वक्तव्य केल्यानंतर सीमाप्रश्नावरुन कर्नाटक महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. दौंड येथील मराठा महासंघाचे कार्यकर्त्यांनी कर्नाटक एसटी महामंडळाच्या निपाणी-औरंगाबाद एसटीला काळे फासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. दौंडमधून जाणाऱ्या कर्नाटक एसटीवर जय महाराष्ट्र आणि जाहीर निषेध असा मजकूर लिहिण्यात आला तसंच कानडी भाषेतील मजकूर काळे फासण्यात आला. तसंच मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.


कलबुर्गी इथे महाराष्ट्राच्या बसला काळी शाई
कर्नाटकच्या बसला दौंड येथे काळे फासल्यावर कर्नाटकात देखील त्याचे पडसाद उमटले. कलबुर्गी येथे महाराष्ट्राच्या बसला काळी शाई लावण्यात आली. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची अक्कलकोट-अफझलपूर बस थांबवून बसला काळी शाई फासली. बसवर बेळगाव आमचेच, अक्कलकोट, जत आमचेच, महाराष्ट्राचा धिक्कार असो असे लिहिलेली पोस्टर लावली. लाल पिवळा झेंडा हाती घेतलेल्या एका कार्यकर्त्याने बसवर चढून घोषणाबाजी केली. 


बसवराज बोम्माई यांच्या कोणत्या वक्तव्यावरुन वाद
सांगलीतल्या जत तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं होतं. त्यानंतर कन्नड भाषिक बहुसंख्य असलेले अक्कलकोट आणि सोलापूर कर्नाटकात विलीन करावेत अशी मागणी  ट्वीटद्वारे करुन मराठी भाषिक आणि महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.