दोन हजारच्या नोटेची लाच स्वीकारणारा पहिला लाचखोर अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2016 08:05 AM (IST)
कोल्हापूर : एकीकडे पंतप्रधानांनी पाचशे-हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असताना कोल्हापुरात एका लिपीकाची लाचेची हाव काही संपलेली नाही. दोन हजाराच्या नव्या कोऱ्या नोटांची 35 हजारांची लाच घेताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत सावर्डेकर असं या लाचखोराचं नाव असून तो कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. शहरातल्या महाराणा प्रताप हायस्कूलमधील मुख्याध्यापकपदाची नेमणूक करण्यासाठी संस्थेच्या लिपिकाकडे सावर्डेकरनं 35 हजारांची लाच मागितली होती. विशेष म्हणजे नवीन नोटांच्या माध्यमातूनच लाच मिळावी अशी अट त्याने घातली होती. ही लाच स्वीकारत असताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. नव्या नोटांनी लाच स्वीकारणारा हा लिपीक देशातला बहुदा पहिलाच लाचखोर ठरला आहे.