मुंबई : शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने आज निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर आता शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दापोलीत शिवसेना आणि ठाकरे गटात जोरदार राडा झालाय. आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला आहे. त्यामुळे दापोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शिवसेनेच्या शाखा आमच्या असल्याचा दावा करत शेकडो कार्यकर्ते जोरदार घोषणाबादी करत दापोलीतील शिवसेनेच्या शाखेत घुसले. उद्धव ठाकरे गटाची शाखा शिंदे गट समर्थकांनी ताब्यात घेतली. शिवाय आमदार योगेश कदम समर्थकांनी उध्वव ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेत घुसून गोंधळ घातला. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या राड्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. तरी देखील दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शिवसेना शाखेत यावेळी दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ शिवसेना शाखेसह परिसरातील वातावरण तापलं होतं.
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.