(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सर्कस आता शेवटच्या घटका मोजतेय! प्रेक्षकांविना ओस पडू लागले सर्कशीचे तंबू!
ज्या सर्कशीचे शो दिवस रात्र हाऊसफुल असायचे मात्र आता रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळत आहेत.कोरोना काळामध्ये सलग दोन वर्ष सर्कसचे प्रयोग बंद होते
beed circus news : लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आकर्षण आणि करमणुकीचा खेळ असलेल्या सर्कसमधील प्रयोग आता हळूहळू बंद होत आहेत. यामुळे संपूर्ण सर्कसच आता बंद होण्याच्या उंबरठ्यावर येऊन थांबली आहे. सर्कस म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात धाडसी खेळाचे प्रयोग. सर्कसमधील जोकरच्या करामती. लहान मोठ्यांचं मनोरंजन करणारी हीच सर्कस आता शेवटच्या घटका मोजत आहे. कारण सर्कशीला मिळणारा प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद आणि त्यामुळे मिळणाऱ्या कमी पैशामुळे सर्कशीतून कमी होत असलेले कलाकार. या कारणांमुळे सर्कस मालकांना सर्कसच बंद करण्याची वेळ आली आहे.
पूर्वी देशभरात 400 च्या वर सर्कस वेगवेगळ्या भागांमध्ये आपले प्रयोग दाखवायच्या आणि याच सर्कशीमध्ये पुढे बाल कलाकार आणि प्राण्यांच्या प्रयोगावर बंदी घातल्याने सर्कशीला हळूहळू वाईट दिवस सुरू झाले. ज्या सर्कशीचे शो दिवस रात्र हाऊसफुल असायचे मात्र आता रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळत आहेत.
सर्कस मालकाला एका दिवसाला 40 ते 45 हजार रुपयांचा खर्च
आता सर्कस चालवायची म्हटलं की सर्कस मालकाला एका दिवसाला 40 ते 45 हजार रुपयांचा खर्च लागतो कारण यामध्ये 50 ते 60 कलाकार काम करत असतात. हे सर्व कलाकार देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून येतात त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय सर्कस मालकालाच करावी लागते. त्यामुळे सर्कसमध्ये दाखवलेल्या प्रयोगांमधून पूर्वीसारखे पैसे मिळत नसल्याचं कलाकार सांगतात..
महाराष्ट्रात सध्या चारच सर्कस शिल्लक
कोरोना काळामध्ये सलग दोन वर्ष सर्कसचे प्रयोग बंद होते. त्यामुळे महाराष्ट्रच नाही तर देशभरातले अनेक सर्कस मालकांना भंगारमध्ये विकाव्या लागल्या. आता महाराष्ट्रात सध्या चारच सर्कस शिल्लक राहिल्या असून त्यांना देखील प्रेक्षकांचा मिळणारा कमी प्रतिसाद हे पाहून या सर्कशी आता इतिहास जमा होणार का याची चिंता सर्कस मालक करत आहेत.
पूर्वी गावात अथवा शहरांमध्ये सर्कस आली की बच्चे कंपनीपासून तरुण आणि वृद्धापर्यंत सर्कस बघायला गर्दी व्हायची. कलाकार सुद्धा मोठ्या कलाकुसरीने अभिनय सादर करायचे. आता ना कलाकार या सर्कशीमध्ये काम करायला तयार आहेत, ना प्रेक्षक सर्कशीच्या तंबूत जायला तयार आहेत.
ही बातमी देखील वाचा