मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर आता सीआयडीकडून कारवाई होणार आहे. प्रशांत कोरटकर वापरत असलेली रोल्स रॉईस ही आलिशान कार सीआयडीकडून जप्त करण्यात येणार आहे. ही गाडी हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या महेश मोतेवारच्या नावावर आहे.
प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचा कॉल करून धमकी दिली होती. त्यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी राज्यभरातून दबाब वाढत होता. दरम्यान, प्रशांत कोरटकर हा त्याच्या नागपूरच्या घरातून पसार झाला असून त्याचा ठावठिकाणा कुठे आहे याची माहिती पोलिसांना नाही.
रोल्स रॉईस जप्त होणार
प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉईस गाडी जप्त करण्यासाठी सीआयडेने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रशांत कोरटकर सध्या मध्य प्रदेशातील इंदुर भागात असल्याची माहिती सीआयडीकडे आहे.
प्रशांत कोरटकरकडे असलेली आलिशान रोल्स रॉईस कार ही हजारो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या कंपनीच्या नावावर आहे. मोतेवारला 2015 साली अटक झाल्यानंतर त्याची मालमत्ता आणि गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र आश्चर्य म्हणजे सात ते आठ कोटी किंमत असलेली ही गाडी जप्त झाली नाही.
कार सीबीआयने ब्लॉक केली होती
ही गाडी कोणाला विकता येऊ नये म्हणून सीबीआयने ही गाडी ब्लॉक केली होती. मात्र तरीही गाडी प्रशांत कोरटकरकडे कशी आली हा प्रश्न आहे. सीआयडीने या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केल्याने काही पोलिस अधिकारी देखील गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याचा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर आणि नागपूरमध्ये गुन्हे दाखल आहेत. कोल्हापुरातल्या प्रकरणात त्याला जामीन मिळाला असला तरी नागपूरच्या प्रकरणात तो फरार आहे.
कोल्हापुरात आंदोलनाची शक्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यावेळी प्रशांत कोरटकरवर कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलन होण्याची शक्यता आहे. प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉईस त्याच्याकडे आली कशी याच गुढ वाढत चालललय? कारण ही गाडी विकण्यास किंवा तिचा लिलाव करण्यास बंदी घातलेली असताना ती कोरटकरकडे कशी आली याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ही बातमी वाचा: