औरंगाबाद : अडीच महिन्यांपासून रिक्‍त असलेल्या औरंगाबाद शहराच्या पोलिस आयुक्‍तपदी नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची नियुक्‍ती राज्य शासनाने केली आहे. मागील महिनाभरापासून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. सोमवारी अखेर मंत्रालयातून आदेश निघाले आणि प्रसाद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.

कचरा प्रश्‍नावरुन मिटमिट्यात दंगल झाली. ती हाताळण्यात कमी पडल्याचा ठपका ठेवून पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांना मुख्यमंत्र्यांनी आयुक्‍तपदावरुन हटवले होते. कचरा टाकण्यास विरोध करणार्‍या मिटमिटा येथील आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला केल्याप्रकरणी राज्य सरकारने त्यांना 15 मार्च रोजी सक्‍तीच्या रजेवर पाठविले. तेव्हापासून हे पद रिक्‍त आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे पदभार आहे. त्यांनी अडीच महिन्यात शहराला पूर्वपदावर आणण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, जुन्या औरंगाबादेत वर्चस्ववादावरून पेटलेल्या दंगलीने त्यांच्या प्रयत्नांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला. मागील पंधरा दिवसांपासून ते दंगलीच्या चौकशीत व्यस्त आहेत.

चिरंजीव प्रसाद हे 1996 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी याआधी 2002 ते 2004 या काळात औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी जालना आणि नागपूर येथेही एसपी म्हणून काम केले.

2011 साली त्यांची केंद्रीय राखीव पोलिस दलात सीआरपीएफमध्ये नियुक्‍ती झाली. सीआरपीएफमध्ये कार्यरत असताना त्यांनी छत्तीसगड आणि बिहारमधील नक्षलविरोधी ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. सध्या ते नांदेड येथे विशेष पोलिस महानिरीक्षक या पदावर कार्यरत होते. आता ते औरंगाबाद पोलीस आयुक्त म्हणून रुजू होतील.