औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मनोज जरांगे यांच्या भेटीला जाण्यावरून कालपासून वेगवेगळ्या चर्चा होत्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कालचा दौरा देखील अचानक रद्द करण्यात आला होता. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उदय सावंत, राधाकृष्ण विखे पाटील हे आज मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार आहे. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री शिंदे हे औरंगाबाद विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर ते औरंगाबाद विमानतळावरून जालनाच्या दिशेने जाणार आहे. विशेष म्हणजे या दौऱ्याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील 16 दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणावर बसले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. मात्र आपलं अमरण उपोषण आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे यांच्या भेटीला जाणार होते. याबाबत मुख्यमंत्र्यांचा दौरा देखील आला होता. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याने, ते जरांगे यांची भेट घेणार की नाही यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जरांगे यांच्या भेटीला जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील हे देखील असणार आहे. विशेष म्हणजे उदय सामंत मुंबईच्या विमानतळावर पोहोचले असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
असा असणार दौरा?
मुख्यमंत्री शिंदे हे मुंबई विमानतळावर पोहोचणार आहे. मुंबई विमानतळावरून शासकीय विमानाने मुख्यमंत्री औरंगाबादच्या विमानतळावर दाखल होणार आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद विमानतळावर येणार असल्याची माहिती होती. मात्र यात आणखी काही तासांचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. तसेच औरंगाबाद विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या इतर मंत्र्यांसह अंतरवाली सराटी गावात पोहोचणार आहे.
फडणवीस येणार का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत अनेक मंत्री देखील असणार आहे. मात्र, याचवेळी देवेंद्र फडणवीस मात्र या शिष्टमंडळात नसणार असल्याची चर्चा आहे. शिष्टमंडळात फडणवीस नसल्याने याबाबत वेगवेगळ्या चर्चा देखील होत आहे.
संबंधित बातम्या: