Marathi language : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) आधी मराठी भाषेला (Marathi language) अभिजात दर्जा (classical language status) मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) प्रयत्न करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबत सरकारला चिमटाही काढला होता. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय प्रलंबित आहे. तो आता निकाली निघण्याची शक्यता आहे. 


उद्धव ठाकरेंनीही घेतली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 


मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यावरुन अनेक निवडणुका लढल्या गेल्या. मात्र, प्रत्यक्षात निर्णय प्रलंबित आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मराठीला अभिजात दर्जा मिळावा याबाबत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे मागणी केली होती. 


लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता


मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाली असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत मुख्यमंत्री विभागाकडून संबधिक विभागाला पत्र लिहून याबाबतचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. 


अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीचे निकष कोणते?  


1) संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावा. 
2) या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे. 
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. 
4) प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.


 अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने फायदा काय? 


1) अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. 
2) अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं. 
3) प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.


सध्या देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. दरम्यान मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहे. मात्र, अद्याप काही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 सालापासून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Marathi: अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काय निकष आहेत? त्याने काय फायदा होतो? आतापर्यंत कोणत्या भाषांना हा दर्जा मिळालाय? जाणून घ्या सर्वकाही