CM Eknath Shinde : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधीमंडळात निवेदन दिलं. तुम्ही जर आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असाल, तर या देशातील जनता आणि आम्ही सहन तो सहन करणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. बोलताना सर्वांनी तारतम्य बाळगलं पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गेले आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्याचं काय?
पंतप्रधान मोदी यांच्या आईचा अंतविधी झाल्यानंतर ते लगेच कर्तव्यावर गेले. राष्ट्रभक्ती, देशभक्ती त्यांच्या नसानसात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांनी ज्यांनी गेले आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्याचं काय? असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. कारवाई करायची असेल तर सर्वांवर झाली पाहिजे असंही ते म्हणाले.
लोकशाही धोक्यात असेल तर भारत जोडो यात्रा कशी काढली?
काल राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारले, त्याचे आम्ही समर्थन केलं नाही. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल असं बोलणं देशद्रोह असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. या देशाचा मान आणि देशाची कीर्ती पोहोचवण्याच काम प्रधानमंत्र्यांनी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लोकशाही धोक्यात असेल तर भारत जोडो यात्रा कशी काढली? जम्मू काश्मीरमध्ये झेंडा फडकावला ना? असे सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला केले. इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. त्यांचाही आम्ही अभिमान बाळगतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात एक वक्तव्य केलं होतं. यावरुनच आता देशभरात भाजपच्या वतीनं राहुल गांधी यांचा निषेध आंदोलन करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप केला होता. याच वक्तव्यावरुन संसदेत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली होती. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपनं लावून धरली आहे. यावर काँग्रेसच्या वतीने नुकताच राहुल गांधींचा एक फोटो ट्विट करत माफी मागायला मला सावरकर समजलात का? अशा पद्धतीचे ट्वीट करण्यात आले होते. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: