मुख्यमंत्र्यांची तारीख मिळेना! वर्षभरापासून 22 कोटी रुपयांची इमार धूळखात, भंडाऱ्यातील लाखंदूरचे नागरिक त्रस्त
एक वर्षांपासून तयार झालेली आणि 22 कोटी रुपये खर्च केलेले लाखांदूर येथील प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा रखडला आहे.
Bhandara News : एका बाजूला मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळं तारीख मिळत नाही, तर, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांशिवाय लोकार्पण नको, किंबहुना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच या इमारतीचं लोकार्पण व्हावं असं स्थानिक काँग्रेस लोकप्रतिनिधींची (आमदार नाना पटोले) भावना असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेचं एक वर्षांपासून तयार झालेली आणि 22 कोटी रुपये खर्च केलेले लाखांदूर येथील प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा रखडला आहे. या रखडलेल्या या लोकार्पणामुळं लाखांदूरचे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
रखडलेल्या कामामुळं लाखांदूरचे सामान्य नागरिक त्रस्त
रखडलेल्या कामामुळं लाखांदूरचे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. कारण त्यांना रोज काम पडणारे तहसील कार्यालय शहराच्या मुख्य वस्तीपासून जवळपास 3 किलोमीटर लांब आहे. ती जागा लहान असल्याने इतर कार्यालय विखुरलेल्या स्वरूपात वेगवेगळ्या भागात भाड्याच्या खोलीत राहतात. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व प्रशासकीय कार्यालय हवेत, ही महाराष्ट्र शासनाची भूमिका भंडाऱ्याच्या लाखांदुरात पराभूत होताना दिसत आहे. विदर्भात कुठल्याही जिल्ह्यात नसावी, अशी सुसज्ज प्रशासकीय इमारत भंडाऱ्याच्या लाखांदुरात तयार झाली आहे.
मधमाशांनी या इमारतीत घर केलंय
मधमाशांनी या इमारतीत आपलं घर केलं आहे. त्यामुळं या भागात जाणं देखील भीतीचं वाटत आहे. प्रशासकीय इणारत कधी सुरु करणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. पण ज्यांच्या हक्काची ही इमारत आहे, तो सामान्य माणूस मात्र, आजही भाड्याच्या आणि जुनाट खोल्यांमधील शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवतोय.
सर्व कार्यालये एकत्रीत येतील या अनुशंगाने लाखांदूर येथील प्रशासकीय इमारत बांधण्यात आली
सर्व कार्यालये एकत्रीत येतील या अनुशंगाने लाखांदूर येथील प्रशासकीय इमारत बांधण्यात आली होती. गेल्या वर्षभारापासून या इमारातीचे कामकाज पूर्ण झाले आहे. अद्यापही या ठिकाणी कोणतेही कामकाज सुरु झाले नाही. कारण अद्याप या इमारतीचा लोकाप्रण सोहळाच झाला नाही. कोट्यावधी रुपयांचा खर्च ही इमारत बांधण्यासाठी करण्यात आला आहे. अनेक कार्यलये भाड्याच्या घरात आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला सुसज्ज इमारत ही धूळ खात पडून आहे. त्यामुळं या इमारतीचा लोकार्पण सोहळा कधी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या उद्धाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रीत करण्यात येणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळं अद्यापही या कार्यक्रमाला वेळ मिळालेली नाही. वर्षभराहून अधिक काळ झालं तरीही ही इमारत सुरु करण्यात आलेली नाही.
























