Chhatrapati Shivaji Maharaj Fort In UNESCO List: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत (UNESCO World Heritage List) समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
युनेस्को म्हणजे काय?
युनेस्को (UNESCO) म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization ही एक संयुक्त राष्ट्रांची वैश्विक संस्था आहे, जी जगभरातील शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि वारसा संवर्धन यासाठी कार्य करते. युनेस्को ही संस्था जगातील ऐतिहासिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या स्थळांना जागतिक वारसा स्थळ (World Heritage Sites) म्हणून घोषित करते.
युनेस्कोच्या वारसा यादीत दर्जा मिळाल्यानंतर काय होतं?
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत दर्जा मिळाल्यामुळे छत्रपती शिवरायांच्या या 12 किल्ल्यांचं महत्त्व जगापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या किल्ल्यांची नोंद झाल्यामुळे संपूर्ण जगाला शिवरायांचं इतिहासातलं महत्त्व कळेल. तसेच जगभरातले पर्यटक या किल्ल्यांना भेट देतील. त्याचप्रमाणे युनेस्को शास्त्रशुद्ध पद्धतीनं या 12 किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मदत करू शकेल. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ठ झाल्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात. पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदींचे मानले आभार-
देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानले आहेत. सदर टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले. सर्वप्रथम मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.