Gold Chhatrapati Sambhajinagar: गोदावरीच्या पात्रात सोनं शोधण्यासाठी झुंबड, पैठणमध्ये नागरिक टोपल्या-चाळण्या घेऊन नदीत उतरले, नेमकं काय घडलं?
दरम्यान, नदीपात्रात वाढती गर्दी पाहता सोन्याच्या शोधाची ही झुंबड परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे सध्या एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. नाथषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी कमी करण्यात आले आहे. पाणी ओसरल्यानंतर नदीचे विस्तीर्ण पात्र उघडे पडले असून, या गाळामध्ये सोनं शोधण्यासाठी शेकडो नागरिकांनी नदीकाठ गाठला आहे. हातात चाळण्या, टोपल्या आणि काही जणांकडे लहान फावडी घेऊन आबालवृद्ध नदीच्या गाळात नशीब आजमावताना दिसत आहेत. सकाळपासूनच नदीपात्रात लोकांची गर्दी होत असून, काही जण गाळ चाळून त्यातून सोन्याचे कण किंवा दागिन्यांचे तुकडे मिळतात का याचा शोध घेत आहेत.
गोदापात्र उघडे पडले, सोन्याच्या आशेनं नागरिक उतरले पत्रात
पैठणमधील नाथ मंदिर परिसराच्या पाठीमागे असलेल्या दशक्रिया विधी घाटावर वर्षभर शेकडो अंत्यविधी आणि दशक्रिया विधी पार पडतात. स्थानिक श्रद्धेनुसार, या विधीवेळी मृत व्यक्तीसोबत अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू किंवा अस्थींसोबत विसर्जित केलेले दागिने नदीच्या पात्रात साचत जातात. वर्षभर पाण्याखाली राहणारा हा गाळ पाणी कमी झाल्यानंतर उघडा पडतो. याच पार्श्वभूमीवर सोनं मिळण्याच्या आशेने नागरिक मोठ्या संख्येने नदीत उतरले आहेत. काहींना किरकोळ धातूचे तुकडे मिळाल्याची चर्चा असली, तरी बहुतांश जण नशीबाच्या भरवशावर गाळ चाळताना दिसत आहेत.दरम्यान, नदीपात्रात वाढती गर्दी पाहता सोन्याच्या शोधाची ही झुंबड परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे नाथषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी कमी करण्यात आले आहे. पाणी ओसरल्यामुळे नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडले असून, या उघड्या पडलेल्या पात्रात सोने शोधण्यासाठी शेकडो लोकांची एकच झुंबड उडाली आहे. एरवी पाणी जास्त असल्याने हे दागिने शोधणे कठीण असते, मात्र आता पाणी कमी झाल्यामुळे हा गाळ उघडा पडला आहे. त्यामुळेच शेकडो लोकं सोनं शोधण्यासाठी नदीत उतरल्याने चित्र पाहायला मिळत आहे.

























