Chhatrapati Sambhajinagar News : खुलताबाद पंचायत समितीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्यानंतर महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर मिठाचा खडा पडला आहे. आमच्याशी कुठलीही चर्चा न करता राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवण्याचं काम भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. याचे उत्तर आता भाजपला मिळेल, आम्ही काय बांगड्या घालून बसलो नाही, या सगळ्या संबंधी भाजप पक्ष नेतृत्वाकडे यासंबंधीची तक्रार करणार असल्याचे सतीश चव्हाण म्हणाले. 

नेमकं प्रकरण काय?

खुलताबाद पंचायत समितीमध्ये भाजपचे 3 राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक सदस्य होता.  या पंचायत समितीमध्ये भाजपकडे सभापतीपद तर आमच्याकडे उपसभापती पद येणार होतं.  मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची कुठलीही चर्चा न करता भाजपच्या स्थानिक आमदार प्रशांत बंब यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत खुलताबाद पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी प्रशांत बंब यांनी ठाकरेंच्या शिवसेना जवळ करत त्यांना उपसभापती पद दिले. युती धर्म त्यांनी पाळला नाही आणि याची तक्रार आम्ही भाजपच्या नेतृत्वाकडे करणार आहोत असे आमदार सतिश चव्हाण म्हणाले. 

आम्ही बांगड्या घालून बसलो नाही,  याचे उत्तर आम्ही देऊ

जर अशाप्रकारे युतीमध्ये काम केले जात असेल तर नक्कीच बाकीच्या ठिकाणी सुद्धा अध्यक्ष बसवायचा असेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मदत त्यांना लागणार आहे. त्यावेळी आम्ही काय करायचं ते बघू. आम्ही बांगड्या घालून बसलो नाही याचे उत्तर आम्ही त्यांना देऊ असेही सतिश चव्हाण यावेळी म्हणाले. 

खुलताबाद पंचायत समितीच्या रिक्त पदांसाठी झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी

खुलताबाद पंचायत समितीच्या रिक्त पदांसाठी झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपच्या सुनीता संजय खंडागळे यांनी सभापती पदाच्या निवडणुकीत बाजी मारली. त्यांना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याने त्यांची निवड सुलभ झाली. सत्तेच्या वाटणीनुसार उपसभापती पद उद्धव ठाकरे गटाकडे गेले. मंदाबाई बद्रीनाथ वाकळे यांची या पदावर वर्णी लागली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीचा संघर्ष सुरू असताना, खुलताबादमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसले. स्थानिक पातळीवरील प्रस्थापित नेत्यांना शह देण्यासाठी किंवा सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर एकमेकांवर टोकाची टीका केली जात असताना, स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र जल्लोष करताना दिसले.