Chhatrapati Sambhajinagar :छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेदरम्यान गंभीर पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळं शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पदवी परीक्षांमध्ये आज वाणिज्य शाखेतील ‘डायरेक्ट टॅक्स’ या 80 गुणांच्या पेपरच्या आधीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुपारी 2 वाजता सुरु होणारा पेपर तब्बल काही तास आधीच विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरुपात मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे.
140 रुपयांमध्ये मिळाली पेपरची पीडीएफ
हा प्रकार दोन दिवसांपूर्वी संबंधित महाविद्यालयाचे संचालक डॉ. सतीश सुराणा यांच्या लक्षात आला होता. परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 11 एप्रिल रोजी परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याच वेळी एका विद्यार्थ्याच्या मोबाईलवर दुपारच्या पेपरची पीडीएफ फाइल आल्याचे त्यांनी पाहिले. सुराणा यांनी तत्काळ संबंधित विद्यार्थ्याचा मोबाईल तपासला असता व्हॉट्सअॅपवरील संवादातून धक्कादायक माहिती समोर आली. सकाळी 10 वाजल्यापासूनच पेपर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी 140 रुपये पाठवण्यास सांगत समोरील व्यक्तीने बारकोड पेमेंट क्यूआर पाठवला होता. विद्यार्थ्याने पैसे भरल्यानंतर दुपारी 1.10 वाजता त्याला पेपरची पीडीएफ प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले. प्रकाराची गंभीरता लक्षात घेऊन डॉ. सतीश सुराणा यांनी तत्काळ विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर विद्यापीठाचे पथक तातडीने परीक्षा केंद्रावर दाखल झाले आणि संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेचे संचालक सतीश सुराणा यांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार समोर आला आहे.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,पेपरबाबत काहीतरी गोष्टी सुरू असल्याचा दोन-तीन दिवसांपासून त्यांच्या कानावर येत होतं. आज बीकॉम तृतीय वर्षाचा 'डायरेक्ट टॅक्स'या विषयाचा पेपर होता.पण पेपर असताना देखील विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात नेहमीप्रमाणे दिसत नसल्याने त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी शिक्षकांच्या मदतीने माहिती घेतली असता महाविद्यालयाच्या बाहेर दोन वाजता सुरू होणारा पेपर एक वाजताच सोशल मीडियावर विकला जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. हा सगळा धक्कादायक प्रकार कळताच सुराना यांनी कसलाही विलंब न लावता थेट विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला आणि या महाघोटाळ्याची सविस्तर माहिती दिली.त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून परीक्षा नियंत्रकांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. हा पेपर कुठून आणि कोणाच्या माध्यमातून फुटला, याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.